अमेरिकेत 'Rabbit Fever' बनला डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे हा विचित्र आजार?
एकीककडे चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) मोठ्या प्रमाणावर पसरत आहे आणि देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेत ‘रॅबिट फीवर’ किंवा टुलारेमिया या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) च्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांत या आजाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हा आजार फ्रॅन्सिसेला टुलारेन्सिस नावाच्या जीवाणूमुळे होतो.
रॅबिट फीवर कसा पसरतो?
साइन्स अलर्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हा आजार वेगवेगळ्या मार्गांनी पसरतो. संक्रमित टिक, डियर फ्लायच्या चाव्यांमुळे, तसेच संक्रमित प्राणी जसे की ससा किंवा उंदरांच्या थेट संपर्काने हा आजार होतो. याशिवाय, संक्रमित प्राण्यांच्या घरट्यांमध्ये किंवा गवतावर असलेल्या जीवाणूंमुळे गवत कापणाऱ्या व्यक्तींना देखील हा आजार होऊ शकतो.
कोणत्या वयोगटातील व्यक्तींना धोका अधिक?
हा आजार मुख्यतः 5 ते 9 वयोगटातील मुलांमध्ये, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये आणि अमेरिकेतील मध्य-पश्चिमेकडील राज्यांतील लोकांमध्ये दिसून येतो.
हा आजार पहिल्यांदा कधी पसरला?
मिळालेल्या माहितीनुसार, साल 2000 मध्ये मॅसॅच्युसेट्स वाइनयार्डमध्ये गवत कापण्यामुळे टुलारेमियाचा उद्रेक झाला होता. सहा महिन्यांच्या काळात 15 लोकांना याचा संसर्ग झाला आणि त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. अशाच प्रकारे 2014-15 मध्ये कोलोरॅडोमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपैकी एक गवत कापण्याशी संबंधित होता.
मृत्यू दर
CDCच्या अहवालानुसार, रॅबिट फीवरमुळे मृत्यू दर साधारणतः दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, काही प्रकारांमध्ये जीवाणूंच्या तीव्रतेनुसार हा दर वाढू शकतो. वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो.
अमेरिकेतील आकडेवारी
2011 ते 2022 दरम्यान अमेरिकेतील 47 राज्यांमध्ये रॅबिट फीवरचे 2,462 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजाराच्या दुर्मिळतेमुळे दर 2 लाख लोकांमध्ये साधारणतः एक रुग्ण आढळतो. मात्र, 2001 ते 2010 च्या काळात या आजाराच्या घटनांमध्ये 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलीकडील काळात 2,400 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
प्रतिबंधक उपाय
रॅबिट फीवर टाळण्यासाठी संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून दूर राहणे, गवत कापताना योग्य संरक्षण घालणे, तसेच टिक चाव्यांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. सीडीसीने या आजारावर लक्ष ठेवले असून वेळेवर निदान व उपचार यावर भर दिला आहे.