'इस्त्रायलला मदत कराल तर याद राखा'; इराणची तेल समृद्ध आखाती देशांना तंबी
तेहरीन : सध्या इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांत युद्ध सुरू आहे. सुरुवातीला इस्त्रायल-हमास नंतर इस्त्रायल-लेबनॉन आता इस्त्रायल-इराण युद्ध होताना दिसत आहे. त्यातच इराणने तेल समृद्ध असलेल्या आखाती देशांना चांगलीच तंबी दिली आहे. ‘इस्त्रायलला मदत कराल तर याद राखा’, असे त्यांनी म्हटले आहे.
इराणने खास करून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन आणि कतार यांसारख्या तेल-समृद्ध देशांना हा इशारा दिला आहे. इराणने आपले अरब शेजारी आणि आखातातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना हा इशारा दिला आहे. इराणवरील कोणत्याही संभाव्य हल्ल्यात इस्त्रायलला मदत करण्यासाठी हवाई हद्द वापरल्यास कठोर बदला घेण्यात येईल, असे इराणने म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यानंतर इस्त्रायलने इराणचा बदला घेण्याची भाषा केली आहे. इराणच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इस्त्रायली अधिकाऱ्यांनी इराणच्या अणु किंवा तेल पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.
…तर चांगले परिणाम होणार नाहीत
अरब देशांना या युद्धात ओढण्याची आपली इच्छा नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन इस्त्रायल किंवा अमेरिकन विमानांना इराणवर हल्ले करण्यासाठी हवाई हद्द वापरायला दिली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आखाती देशांना युद्धात आपले तेलसाठे लक्ष्य केले जाण्याची भीती आहे.