Iran held its first solo drill Thursday firing missiles and drones in the Indian Ocean
Iranian Military News : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. इस्रायलसोबतच्या युद्धानंतर काही महिन्यांतच इराणने हिंदी महासागरात भव्य लष्करी कवायती करून जगाचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी (२१ ऑगस्ट २०२५) इराणी नौदलाने ‘सस्टेनेबल पॉवर १४०४’ या नावाने स्वतंत्र सराव केला. या सरावात इराणने ड्रोन व क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत आपली लष्करी ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
इराणी संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा सराव देशाच्या दक्षिणेकडील पाण्यात झाला. या वेळी इराणी नौदलाने हिंदी महासागरातील खुल्या पाण्यात लक्ष्यांवर हल्ल्याची अचूक क्षमता दाखवून दिली. मागील महिन्यातच इराणने कॅस्पियन समुद्रात रशियासोबत ‘CASREX २०२५’ नावाचा सराव केला होता. त्यानंतर केवळ एका महिन्यातच इराणने स्वतंत्र लष्करी कवायती उभारल्याने जागतिक पातळीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
जून महिन्यात इस्रायल-इराण युद्धाने मध्यपूर्वेत धुमाकूळ घातला होता. तब्बल १२ दिवस चाललेल्या संघर्षात इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले केले. या मोहिमेत काही दिवस अमेरिकाही थेट सहभागी झाली होती. इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त झाले, तसेच अनेक वरिष्ठ कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा बळी गेला. इस्रायलच्या सततच्या बॉम्बहल्ल्यामुळे इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ देखील मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्याचे मानले जाते. या गंभीर नुकसानीनंतर, इराणने आता स्वतःची ताकद दाखवण्यासाठी हिंदी महासागराची निवड केली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा सराव केवळ लष्करी तयारी नाही तर अमेरिकेला आणि इस्रायलला दिलेला ‘कडक संदेश’ आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी
इराणच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, शत्रूकडून होणाऱ्या कोणत्याही नव्या हल्ल्याला उत्तर द्यायला इराण सज्ज आहे. “आमच्यावर हल्ला झाला तर त्याचे प्रत्युत्तर अधिक कठोर पद्धतीने दिले जाईल,” असे अधिकृत निवेदनात सांगितले गेले. इराणी माध्यमांच्या मते, या सरावाद्वारे इराणने आपली ड्रोन तंत्रज्ञानातील प्रगती तसेच समुद्रावरून क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता दाखवून दिली आहे. यामुळे पर्शियन गल्फपासून हिंदी महासागरापर्यंत इराणच्या प्रभावक्षेत्राची जाणीव जगाला करून देण्याचा प्रयत्न आहे.
इस्रायल-इराण युद्धानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला थेट इशारा दिला आहे. जर इराणने पुन्हा युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प सक्रिय केले किंवा अणु तळ सुसज्ज केले, तर अमेरिका थेट हल्ला करेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. याचदरम्यान, इराणने अमेरिकेशी होणाऱ्या अणु चर्चांना पुढे ढकलले आहे. इराणी राजनयिकांनी स्पष्ट केले की, “अमेरिकेसोबत परिणामकारक अणु चर्चा करण्याची वेळ अद्याप आलेली नाही.” तथापि, संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांशी सहकार्य पूर्णपणे बंद केले जाणार नाही, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा विश्लेषकांच्या मते, इराणच्या या सरावाचा उद्देश द्विस्तरीय आहे.
१) इस्रायल व अमेरिकेला धाक दाखवणे,
२) आपल्या जनतेला आश्वस्त करणे की इराण अजूनही सामर्थ्यवान आहे.
इराणने उभारलेली ही कवायत केवळ मध्यपूर्व नव्हे तर संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. कारण, इराणकडे मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे, ड्रोन तंत्रज्ञान आणि पर्शियन गल्फमधील सामरिक नियंत्रण आहे. अमेरिकेच्या उपस्थितीमुळे हा तणाव पुढे जाऊन मोठ्या युद्धात परिवर्तित होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे
हिंदी महासागरातील क्षेपणास्त्रांची चाचणी आणि ड्रोन कवायत ही इराणची ‘सामरिक ताकद’ दाखवण्याची रणनीती आहे. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेच्या थेट हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. अणु चर्चेला विलंब आणि लष्करी कवायतींची मालिका यामुळे जग पुन्हा एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.