Scientists discovered a distant Super Earth with potential for water and life
तेनेरिफे (स्पेन) – खगोलशास्त्रज्ञांनी एक अद्वितीय शोध लावला आहे. पृथ्वीपासून अवघ्या २० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका ग्रहाचा शोध लागला असून, तो आपल्या ग्रहासारखाच असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे या ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पेनमधील Instituto de Astrofísica de Canarias आणि Universidad de La Laguna यांनी हा शोध लावला असून, त्यांनी या नव्या ग्रहाला ‘सुपर अर्थ’ असे नाव दिले आहे. हा ग्रह HD 20794 या सूर्यासारख्या तारकाभोवती परिभ्रमण करतो. हा शोध खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनबाहेर जन्म घेणार दलाई लामांचा उत्तराधिकारी; बीजिंगवर उभे ठाकले नवे संकट
रहस्यमय ‘सुपर अर्थ’ आणि त्याची वैशिष्ट्ये
हा नवीन शोध लागलेला ग्रह पृथ्वीच्या तुलनेत सहा पट अधिक वस्तुमान असलेला आहे. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या तारकाभोवती ६४७ दिवसांत एक परिभ्रमण पूर्ण करतो. या परिभ्रमणामुळे तो एका ‘राहण्यायोग्य क्षेत्रात’ येतो, ज्यामुळे येथे पाण्याच्या अस्तित्वाची शक्यता अधिक वाढते. ग्रहांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, ‘सुपर अर्थ’च्या परिभ्रमणाचा कालावधी मंगळाच्या कक्षेपेक्षा अवघ्या ४० दिवसांनी कमी आहे. याचा अर्थ असा की, तो ताऱ्यापासून अगदी योग्य अंतरावर स्थित आहे, जिथे द्रव स्वरूपात पाणी टिकून राहू शकते.
‘सुपर अर्थ’चा दीर्घकालीन शोध
हा ग्रह नवा असला तरी, मागील २० वर्षांपासून त्याचा अभ्यास सुरू होता. खगोलशास्त्रज्ञांनी अनेक दशकांपासून विविध ग्रहांच्या हालचालींवर संशोधन केले आणि त्यातून हे धक्कादायक सत्य समोर आले. विशेष म्हणजे, HD 20794 या तारकाभोवती फिरणारा हा पहिलाच ग्रह नाही. याआधीही त्याच्या कक्षेत दोन ग्रह सापडले होते. शास्त्रज्ञांनी याआधीच्या संशोधनात अनेक एक्सोप्लॅनेट्स (सौरमंडळाबाहेरील ग्रह) शोधले आहेत, मात्र हा ग्रह विशेष आहे. कारण त्याचे पृथ्वीसारखे गुणधर्म आणि योग्य कक्षा ही वैशिष्ट्ये राहण्यायोग्य परिस्थिती दर्शवतात.
पृथ्वीशिवाय जीवसृष्टीचा संभाव्य ठिकाण?
शास्त्रज्ञ पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टीच्या शक्यतेचा शोध घेत आहेत. या संशोधनाचा उद्देश अंतराळात मानवी वसाहतीसाठी नवीन पर्याय शोधणे आहे. या दिशेने हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर या ग्रहावर पाणी आणि योग्य वातावरण असेल, तर भविष्यात तो मानवासाठी नवीन निवासस्थान ठरू शकतो. हा शोध भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी दिशादर्शक ठरेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जे करायचे ते करा…’ इराणचे ट्रम्प यांना रोखठोक उत्तर; महासत्ता अमेरिकेला आव्हान
मानवी जगासाठी आशेचा किरण?
जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मर्यादा पाहता, पृथ्वीव्यतिरिक्त पर्याय शोधणे ही मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट बनली आहे. ‘सुपर अर्थ’ हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या ग्रहावर संशोधन करण्यासाठी भविष्यात प्रगत दुर्बिणी आणि अंतराळ मोहिमा पाठवल्या जातील. या ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास केल्यानंतरच खरोखर तो राहण्यायोग्य आहे का, याचा निर्णय होईल. या शोधामुळे मानवी जीवनाला एक नवीन दिशा मिळू शकते, आणि भविष्यात हा ग्रह आपल्या अस्तित्वासाठी नवा आधार ठरू शकतो.