'जे करायचे ते करा...' इराणने ट्रम्पला दिले रोखठोक उत्तर; महासत्ता अमेरिकेला आव्हान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
तेहरान – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प परतल्यापासून इराण आणि अमेरिकेतील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या वाढत्या दबावाला प्रत्युत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणच्या आण्विक कार्यक्रमावर वाटाघाटी करण्यास सांगितले असता, पेझेश्कियान यांनी ठाम शब्दांत अमेरिकेला उत्तर दिले “तुम्हाला जे करायचे ते करा.”
अमेरिकेच्या धमक्यांना इराणचा ठाम विरोध
इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या दबावाखाली इराण आपला आण्विक कार्यक्रम रोखणार नाही किंवा कोणत्याही वाटाघाटींमध्ये सामील होणार नाही. त्यांनी ट्रम्प प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अमेरिका आम्हाला धमक्या देऊ शकत नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. अमेरिकेने जर आमच्यावर निर्बंध लादले, तर आम्हीही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ.” इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही शनिवारी याच गोष्टीला दुजोरा दिला. त्यांनी अमेरिकेच्या दबावाला झुगारून दिले आणि सांगितले की, “इराण कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही किंवा वाटाघाटी करणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jaffar Express Train Hijack: पीडितांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले ‘अकरा वाजता काकांनी शेवटचा कॉल केला आणि नंतर…
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पुन्हा एकदा इराणवर कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराण आणि प्रमुख जागतिक शक्तींमध्ये आण्विक करार केला होता. या करारानुसार, इराणने आपल्या आण्विक कार्यक्रमावर मर्यादा आणण्याचे मान्य केले होते, तर त्याऐवजी अमेरिकेने काही आर्थिक निर्बंध उठवले होते. मात्र, ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी हा करार मोडला आणि इराणवर पुन्हा कडक निर्बंध लादले.
अमेरिकेने इराणला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी तेल निर्यात रोखण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचबरोबर, अमेरिकेने इराकला इराणकडून वीज खरेदी करण्याची दिलेली परवानगीही मागे घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आणि स्पष्ट केले की, “इराण धमक्या आणि निर्बंधांच्या दबावाखाली कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करणार नाही.”
इराण-रशिया-चीन यांचा नौदल सराव: अमेरिका आणि पश्चिम देशांवर दबाव
अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी, इराणने चीन आणि रशियासोबत संयुक्त लष्करी सराव केला. ‘सागरी सुरक्षा बेल्ट २०२५’ या नावाने झालेल्या या सरावामध्ये तीनही देशांनी आपली नौदल क्षमता प्रदर्शित केली. हा सराव सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ ओमानच्या आखातात पार पडला.
जगातील एकूण तेल व्यापारापैकी २०% व्यापार याच समुद्री मार्गातून जातो. त्यामुळे इराण, रशिया आणि चीन यांचा हा लष्करी सराव अमेरिकेसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. गेल्या पाच वर्षांपासून तिन्ही देश हा संयुक्त लष्करी सराव करत आहेत, मात्र या वर्षीच्या सरावाला विशेष महत्त्व आहे, कारण यामुळे पश्चिम देशांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हे’ ठिकाण आहे जगातील प्रदूषणमुक्त नंदनवन; शास्त्रज्ञांनी शोधून काढले असे ठिकाण जिथे अस्वच्छ हवेचा मागमूसही नाही
इराणचा लढा सुरूच!
इराणने या सरावाद्वारे अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांना स्पष्ट संदेश दिला आहे की, ते कोणत्याही प्रकारे दबावाला बळी पडणार नाहीत. ट्रम्प प्रशासनाने इराणवर निर्बंध लादून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी इराणच्या सरकारने आणि लष्कराने स्पष्ट केले आहे की, “आम्ही आमच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढू.” इराणच्या या ठाम भूमिकेमुळे अमेरिकेच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, जागतिक राजकारणात याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतात.