Titanic letter sold for ₹3.41 crore after 113 years
Titanic letter auction : जगाच्या इतिहासातील सर्वांत दुर्दैवी समुद्र अपघातांपैकी एक असलेल्या टायटॅनिक जहाजाच्या संदर्भात एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. टायटॅनिक बुडण्यापूर्वी लिहिलेले एक पत्र युकेमध्ये झालेल्या लिलावात तब्बल ३.४१ कोटी रुपयांना (सुमारे £३००,०००) विकले गेले आहे. हे पत्र लिहिणारे प्रवासी होते कर्नल आर्चीबाल्ड ग्रेसी, जे त्या भीषण दुर्घटनेतून थोडक्याच अंतराने वाचले होते. १५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते. या घटनेत सुमारे १५०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. २,२०० प्रवाशांपैकी ग्रेसी हे काही मोजक्या वाचलेल्यांपैकी एक होते.
हे पत्र १० एप्रिल १९१२ रोजी लिहिले गेले होते, ज्या दिवशी कर्नल ग्रेसी साउथहॅम्प्टन बंदरातून टायटॅनिकवर चढले होते. या पत्रात त्यांनी एका परिचिताला लिहिताना म्हटले होते की, “चांगल्या जहाजाबद्दल निर्णय देण्याआधी मी प्रवासाच्या शेवटपर्यंत वाट पाहीन.” विशेष म्हणजे, हे भविष्यसूचक वाक्य त्यांच्या पत्राचे सर्वांत खास वैशिष्ट्य ठरले आहे.
या पत्राने लिलावात अपेक्षेपेक्षा पाचपट अधिक किंमत मिळवली. विल्टशायरमधील हेन्री अल्ड्रिज अँड सन लिलाव गृहात एका अज्ञात खरेदीदाराने या ऐतिहासिक दस्तावेजाची खरेदी केली. हे पत्र केबिन C51 मधून लिहिले गेले होते आणि जहाज ११ एप्रिल रोजी आयर्लंडच्या क्वीन्सटाऊन बंदरावर थांबले असताना पोस्ट करण्यात आले होते. त्यावर १२ एप्रिलची लंडन पोस्टमार्किंगही आहे. लिलाव अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टायटॅनिकवरील लिहिलेल्या कोणत्याही पत्रासाठी मिळालेली ही आजवरची सर्वाधिक किंमत आहे, जी या पत्राच्या ऐतिहासिक आणि भावनिक मूल्याचे प्रतीक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड
अपघाताच्या रात्री, टायटॅनिक हिमखंडाला धडकल्यानंतर जहाज जलद गतीने पाण्यात बुडू लागले. कर्नल ग्रेसी यांनी या भीषण प्रसंगात उलटलेल्या लाईफबोटमध्ये चढून आपला जीव वाचवला. परंतु बर्फाळ पाण्यात अनेक प्रवासी प्रचंड थंडी आणि थकव्यामुळे मृत्युमुखी पडले. ग्रेसीही या भीषण प्रसंगातून वाचले, परंतु हायपोथर्मिया आणि दुखापतींमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला.
टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर काही महिन्यांतच, कर्नल ग्रेसी यांनी आपल्या अनुभवावर आधारित “द ट्रुथ अबाउट द टायटॅनिक” हे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी जहाजाच्या बुडण्याचा थरारक अनुभव तपशीलवार मांडला. मात्र त्यांच्या प्रकृतीत आलेल्या घसरामुळे ते डिसेंबर १९१२ मध्ये कोमात गेले आणि २ डिसेंबर १९१२ रोजी मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे निधन पावले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे खरे कारण?
आजही टायटॅनिकच्या अपघाताच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत. कर्नल ग्रेसी यांचे पत्र म्हणजे त्या काळातील भयावहतेची आणि मानवी जिद्दीची जिवंत साक्ष आहे. ११३ वर्षांनंतरही, टायटॅनिकच्या कथांनी आणि त्या काळच्या जिवंत पुराव्यांनी जगाला भावनिक करून सोडले आहे. या ऐतिहासिक पत्राच्या यशस्वी विक्रीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मानवी भावना, इतिहासाची साक्ष आणि शौर्यकथा या अनमोल ठेव्याला कोणतीही किंमत मोजता येत नाही.