US Iran war escalation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर थेट हवाई हल्ला करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. अमेरिकेच्या वतीने रविवारी ( 22 जून 2025 ) पहाटे इराणमधील तीन प्रमुख अणुउत्पादन स्थळांवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना संबोधित करत इराणला तीव्र शब्दांत इशारा दिला “सुरुवात इराणने केली, पण शेवट अमेरिका करेल.”
या हल्ल्यामुळे इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाला आणखी गती मिळाली असून, आता अमेरिका या संघर्षात थेट सहभागी झाली आहे. हल्ला झालेली स्थळे म्हणजे फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान – ही सर्व अण्विकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठिकाणे आहेत, जिथे इराण आपला अणुकार्यक्रम विकसित करत होता.
ट्रम्प यांचे वक्तव्य – इराण अण्वस्त्रांपासून दूरच राहावा
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर या कारवाईची अधिकृत माहिती देताना सांगितले की, “ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सर्व विमाने सुरक्षितपणे इराणच्या हवाई हद्दीबाहेर परतली आहेत आणि पूर्ण बॉम्ब पेलोड फोर्डो केंद्रावर टाकण्यात आला आहे.” आपल्या भाषणात ट्रम्प म्हणाले की, “इराणने गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका व इस्रायलविरोधात जहरी बोलणी केली आहेत. त्यांनी शांततेच्या मार्गाचा स्वीकार करावा, अन्यथा अशा आणखी हल्ल्यांना तयार राहावं लागेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : अमेरिकेचीही युद्धात जोरदार एंट्री! ‘B-2 bombers’ आणि ‘Tomahawk missiles’नी इराणमध्ये केला कहरच
इराणचे अणुकार्यक्रम – अमेरिकेसाठी धोक्याची घंटा
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “इराणला अण्वस्त्र मिळवू दिले जाणार नाहीत.” ते म्हणाले की, “इराण हा केवळ इस्रायलसाठी नाही, तर अमेरिकेसाठीही एक गंभीर धोका बनला आहे.” त्यांच्या मते, या हल्ल्याचा उद्देश इराणच्या अणुकार्यक्रमाला रोखणे आहे. इराणच्या फोर्डो केंद्रावर केंद्रित हल्ला करण्यात आला असून, हा भाग इराणच्या अणुसंशोधनाचा मुख्य आधार मानला जातो. नतान्झ व इस्फहान या केंद्रांवरही क्षती झाली असून, यामुळे इराणचा अणुकार्यक्रम काही काळासाठी थांबवला जाऊ शकतो, असे अमेरिकी लष्करातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
credit : social media
इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेचा निर्धार
या कारवाईनंतर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधून त्यांना विश्वास दिला की “इस्रायल आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे.” नेतान्याहूंनी अमेरिकेचे आभार मानत ही कारवाई इस्रायलच्या सुरक्षेसाठी निर्णायक ठरेल, असे म्हटले आहे.
जागतिक पातळीवर तणाव वाढण्याची शक्यता
या हल्ल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अधिक उग्र होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रे आणि युरोपियन देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली, तरी तणावपूर्ण वातावरण पाहता, प्रतिहल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Biological Weapon : अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक असतात ‘ही’ शस्त्रे; एकाच वेळी संपूर्ण देश गिळंकृत करू शकण्याची क्षमता
ट्रम्प सरकारची आक्रमक धोरणे पुन्हा चर्चेत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत अमेरिकेने पुन्हा एकदा आक्रमक धोरण अवलंबल्याचे या हल्ल्यामुळे स्पष्ट झाले आहे. “युद्ध सुरू इराणने केले, पण संपवणार आम्ही”, या घोषणेमुळे जागतिक राजकारणात नवे वादळ उठण्याची चिन्हे आहेत. या हल्ल्यामुळे केवळ इराणच नव्हे, तर पूर्ण मध्यपूर्व आणि युरोपमध्येही अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात या संघर्षाचे परिणाम किती गंभीर ठरतील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.