biological weapons threat : युद्ध म्हटले की डोळ्यासमोर रणगाड्यांचा धूर, क्षेपणास्त्रांचा आवाज आणि अणुबॉम्बचा महाविनाश दिसतो. मात्र, आता युद्धाचा चेहरा बदलत चालला आहे. जगात अशी शस्त्रे उदयाला आली आहेत जी न दिसता, न ऐकता संपूर्ण देश गिळंकृत करू शकतात. ही शस्त्रे म्हणजे जैविक शस्त्रे (Biological Weapons). तज्ज्ञांच्या मते, ही शस्त्रे अणुबॉम्बपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतात.
जैविक शस्त्र म्हणजे काय?
जैविक शस्त्रे म्हणजे विषाणू, जीवाणू किंवा विषारी जैविक घटकांद्वारे तयार करण्यात आलेली हत्यारे, जी मानव, प्राणी किंवा पिकांवर हल्ला करतात. यामध्ये अन्न, पाणी किंवा हवेतून संसर्ग पसरवला जातो. ही शस्त्रे पारंपरिक बॉम्बप्रमाणे आवाज करत नाहीत, परंतु त्यांच्या परिणामामुळे संपूर्ण शहर आजारी पडू शकते, आरोग्य व्यवस्था कोसळू शकते आणि मृत्यूदर झपाट्याने वाढू शकतो.
अणुबॉम्ब विरुद्ध जैविक शस्त्रे
अणुबॉम्ब किती घातक असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी. या हल्ल्यांनी केवळ त्या दोन शहरांना नाही, तर संपूर्ण पिढ्यांना उध्वस्त केले. आजही त्या भागांमध्ये या आघाताचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळेच अणुयुद्ध ही एक भीतीदायक संकल्पना आहे. पण जैविक शस्त्रे ही आणखी एक पायरी पुढे गेलेली भयानक कल्पना आहे. युद्धाच्या नव्या तंत्रज्ञानात दृश्यात न येणारी, पण प्रचंड प्रभावशाली अशी शस्त्रे निर्माण झाली आहेत. जैविक शस्त्रे यामध्ये आघाडीवर आहेत. ही शस्त्रे काही सेकंदात हजारो-लाखो लोकांना संसर्गित करू शकतात, आणि त्याचे परिणाम लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: इराण इस्त्रायल युद्ध पार्श्ववभूमीवर ‘हा’ अनोख्या मिसाइलचा VIDEO सोशल मीडियावर का होतोय इतका VIRAL??
जैविक शस्त्रांचा प्रभाव आणि धोका
जैविक शस्त्रे हल्ला केव्हा होतो हे समजतच नाही. लक्षणे दिसण्यास अनेक वेळ लागतो, तोपर्यंत संसर्ग झपाट्याने पसरलेला असतो. हे शस्त्र एकदा वापरले गेले की त्याला थांबवणे अत्यंत कठीण होते. अशा हल्ल्यामुळे देशाची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडते. अन्न, पाणी आणि हवेच्या माध्यमातून हे शस्त्र कार्यरत होते, त्यामुळे प्रत्येक नागरिक संकटात सापडतो. उदाहरणार्थ, कोरोना महामारी अनेक तज्ज्ञांनी जैविक शस्त्राच्या संकल्पनेशी जोडली होती, जरी त्यावर अधिकृत पुष्टी झालेली नसेल. पण या संकटाने जगभरात आरोग्य व्यवस्थेचे आणि सरकारांच्या तयारीचे कंबरडे मोडले.
जगासाठी गंभीर इशारा
भारत आणि पाकिस्तानसारख्या अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये जर युद्धाची शक्यता निर्माण झाली, तर जगाची चिंता अणुबॉम्बकडे असते. मात्र आता जैविक शस्त्रे ही आणखी भीतीदायक बाब ठरतेय. कारण यासाठी रॉकेट, बॉम्ब किंवा महाकाय यंत्रणा आवश्यक नसते. कमी खर्चात, गुप्तपणे आणि प्रभावीपणे हे शस्त्र वापरले जाऊ शकते. जगातील अनेक देश जैविक शस्त्रांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय करारांमध्ये सामील झाले असले, तरी अनेकांनी या शस्त्रांचा गुप्त साठा करून ठेवलेला असल्याची शंका व्यक्त केली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता जग भीतीच्या छायेत! अमेरिकेची इराणवर ‘First strike’ची तयारी? ‘Diego Garcia’वर बी-2 बॉम्बर्सची तैनाती
अदृश्य जैविक शस्त्रांचाही गंभीर धोका
जगाला आज फक्त अणुबॉम्बच नव्हे, तर अदृश्य जैविक शस्त्रांचाही गंभीर धोका आहे. या शस्त्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक नियम बनवण्यासाठी जगभरातील देशांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा युद्धाचा चेहरा कधी बदलून संपूर्ण मानवजातीला संकटात टाकेल हे सांगता येणार नाही.