Trump's F-35 sale to India faces criticism for hypocrisy as he funds Pakistan's F-16s
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतासाठी पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट F-35 देऊ करण्याची घोषणा केली असली, तरी पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून त्यांनी भारताशी दुहेरी धोरण स्वीकारल्याची टीका होत आहे.
अमेरिकेने नुकतीच पाकिस्तानला 397 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत जाहीर केली असून, ही रक्कम प्रामुख्याने पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या देखभालीसाठी वापरण्यात येणार आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण अमेरिकेने सुरुवातीला पाकिस्तानला कोणतीही मदत न करण्याचे धोरण स्वीकारले होते.
2018 मध्ये मदत थांबवणारे ट्रम्प आता पाकिस्तानला निधी देत आहेत
2018 मध्ये ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिली जाणारी सर्व लष्करी मदत थांबवली होती. तेव्हा ट्रम्प यांनी पाकिस्तानवर कडक शब्दांत टीका करत, हा देश अमेरिकेच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचे सांगितले होते. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून अनेकदा लक्ष्य केले होते. मात्र, त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानबाबत अचानक मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर, ट्रम्प यांनी परदेशी देशांना अमेरिकन आर्थिक मदत देण्यास बंदी घातली होती. परंतु महिन्याभरातच त्यांनी हा निर्णय बदलत, पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी मोठा निधी जाहीर केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : खुशखबर! Air India ने लगेज नियमात केला मोठा बदल; प्रवासाला निघण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ महत्त्वाचा नियम
पाकिस्तानसाठी 397 दशलक्ष डॉलर्स, पण मर्यादा लागू
रॉयटर्सच्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाने 243 वस्तूंना मदतीच्या यादीतून वगळले असून, त्यात पाकिस्तानला देण्यात आलेली 397 दशलक्ष डॉलर्सची मदत देखील समाविष्ट आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानला दिलेल्या F-16 लढाऊ विमानांचा वापर केवळ दहशतवादविरोधी कारवायांसाठीच केला जाईल. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान हे विमान भारताविरुद्ध वापरू नये, यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कठोर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
भारताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 फायटर जेट विक्रीसाठी तयारी दर्शवली असली, तरी पाकिस्तानला F-16 विमानांसाठी आर्थिक मदत देणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते. पाकिस्तानच्या हातात असलेल्या F-16 मुळे भारताच्या हवाई सामर्थ्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर भारत सरकारने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, हा निर्णय भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यावर परिणाम करू शकतो, असे मानले जात आहे.
ट्रम्प यांचा बदलता पवित्रा
ट्रम्प यांच्या धोरणात आलेला हा बदल अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. पहिल्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेतली होती, मात्र दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते भारताशी दुहेरी खेळ करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nostradamus Prediction : नॉस्ट्राडेमसची ‘ही’ भविष्यवाणी आहे आणि पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीशी संबंधित
भारताची पुढील भूमिका काय?
पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेल्या या मदतीवर भारत काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ट्रम्प यांच्या निर्णयावर भारत कशा प्रकारे प्रतिसाद देतो आणि अमेरिका-भारत संबंधांवर याचा कसा परिणाम होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.