US Donald Trump administration gives orders to consumer protection agency to stop work
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ट्रम्प प्रशासनाने ग्राहक वित्तीय संरक्षण ब्युरो (CFPB) संस्थेचे सर्व कामकाज थांबवण्याचा आदेश दिला आहे. 2008 मधील आर्थिक संकटानंतर ग्राहकांच्या हितासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता या एजन्सीला बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
CFPB ला काम बंद करण्याचा आदेश
अमेरिकेच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयाचे नवनियुक्त संचालक रसेल वॉट यांनी शनिवारी रात्री पाठवलेल्या ईमेलमध्ये CFPB ला संपूर्ण कामकाज थांबवण्याचा आदेश दिले आहेत. यामुळे एजन्सीची सर्व कामे रखडली आहेत.
ओबामा प्रशासनाच्या काळात स्थापन झाली संस्था
मिळालेल्या माहितीनुसार, 2007-08 मध्ये आर्थिक संकटानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010 मध्ये ग्राहकांच्या हितासाठी वित्तीय सुधार कायद्याअंतर्गत या संस्थेची स्थापना केली होती. मात्र, रिपब्लिकन आणि इतर पुराणमतवादी गटांनी या एजन्सीवर टीका केली होती. आता ट्रम्प प्रशासनाने अखेर ही एजन्सी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला.
USAID एजन्सीवरही बंदी
याशिवाय, ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट संस्था (USAID) बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे USAID ला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प प्रशासनाने यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) च्या बहुतांश कर्मचार्यांना जबरदस्तीने सुट्टीवर पाठवले होते. 60 वर्षे जुनी ही संस्था बंद करण्याच्या योजनेंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात अनेक कर्मचार्यांनी संघीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायालयात ट्रम्प प्रशासनाविरोधात केस
फेडरल कर्मचारी संघटनांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना काँग्रेसच्या मंजुरीशिवाय ही एजन्सी बंद करण्याचा अधिकार नाही. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला.
कर्मचार्यांचा अनोखा निषेध
USAID मुख्यालयाच्या बाहेर कर्मचार्यांनी संस्थेचे नाव झाकण्यासाठी डक्ट टेप चा वापर केला आणि कार्यालयाबाहेर फुलांचा गुच्छ ठेवला. काही कर्मचार्यांनी संस्थेचा झेंडा खाली उतरवला आणि आपला विरोध व्यक्त केला. ट्रम्प यांनी USAID च्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर “इसे बंद कर दो” असे वक्तव्य केले होते, यामुळे अधिक वाद निर्माण झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय जागतिक स्तरावर वादग्रस्त ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय मदत कार्यक्रमांसाठी काम करणाऱ्या संस्थांना अचानक बंद करणे आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे, असे मत अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.