Virgin Atlantic Delhi-London flight makes emergency landing in Istanbul after glitch 7-hour delay
Virgin Atlantic VS301 emergency landing : दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक एअरलाईन्सच्या VS301 या आंतरराष्ट्रीय विमानात उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात २५० हून अधिक प्रवासी होते. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठा अपघात टळला, मात्र लँडिंगनंतर प्रवाशांना तब्बल सात तास अडकून राहावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
VS301 हे व्हर्जिन अटलांटिकचे विमान दिल्लीहून लंडनला नियमित उड्डाण करत होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाडाचे संकेत मिळाले. याबाबत विमानातील प्रवासी निदा सैफी यांनी सांगितले की, उड्डाणादरम्यान अचानक क्रू मेंबर्सनी प्रवाशांना सूचना दिल्या आणि आपत्कालीन लँडिंगसाठी तयारी करण्यास सांगितले. क्रू सदस्यांमध्ये थोडा तणाव दिसून येत होता, पण वैमानिकाने परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळली आणि विमान सुरक्षितपणे इस्तंबूलमध्ये उतरवले.
विमान सुरक्षित लँडिंगनंतर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर विमानतळावर तब्बल सात तास प्रतीक्षा करावी लागली. या काळात अन्न, पाणी आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध नव्हत्या, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. डॅन मल्होत्रा नावाच्या प्रवाशाने ट्विट करत सांगितले की, “सुमारे २५० लोक विमानतळावर अडकले आहेत, माहिती देणारे कोणीही नाही, अन्नपाण्याचीही व्यवस्था नाही.” त्याचप्रमाणे, के. के. चौधरी यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, “एवढ्या गंभीर प्रसंगातही एअरलाइनचा एकही प्रतिनिधी उपस्थित नाही. आम्हाला स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागत आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘400 किमीची रेंज, लक्ष्य होईल नष्ट…’ भारताचा इस्रायलसोबत ‘LORA’ क्षेपणास्त्राचा करार; पाकिस्तान चिंतेत
ही बाब सोशल मीडियावर चांगलीच गाजली. प्रवाशांनी व्हर्जिन अटलांटिकवर व्यवस्थापनाच्या उदासीनतेचा आरोप करत मोठ्या प्रमाणात टीका केली. या टीकेनंतर व्हर्जिन अटलांटिकने अधिकृत पत्रक जारी करत स्पष्टीकरण दिले की, “एका किरकोळ तांत्रिक कारणामुळे इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. आम्ही लंडनहून एक पर्यायी विमान पाठवत आहोत, जे रात्री १०:५५ वाजता इस्तंबूलहून निघेल आणि ००:१५ वाजता लंडनला पोहोचेल. प्रवाशांसाठी टर्मिनलवर अल्पोपहार आणि आरामदायी सुविधा देण्यात येत आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कूटनीतीच्या नव्या दिशा! BRICS परिषदेत भारत-रशिया बैठकीला गुप्त रंग; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
ही संपूर्ण घटना विमानप्रवासातील सुरक्षा, तांत्रिक व्यवस्था आणि प्रवासी व्यवस्थापन या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित करते. वैमानिकाचे निर्णय कौतुकास्पद असले तरी, प्रवाशांशी योग्य संवाद आणि सुविधा व्यवस्थापनाच्या बाबतीत व्हर्जिन अटलांटिकला अपयश आल्याचे स्पष्ट होते. भविष्यात अशा घटनांत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एअरलाइन कंपन्यांनी अधिक चोख आणि तत्पर सेवा देण्याची गरज आहे.