India‑Russia BRICS security talks : ब्राझीलमध्ये पार पडलेल्या १७व्या ब्रिक्स शिखर परिषदेमुळे जगभरातील राजनैतिक चर्चांना नवे परिमाण लाभले आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात एक महत्त्वाची द्विपक्षीय बैठक झाली. ही भेट जरी औपचारिक शिखर परिषदेबाहेर झाली असली, तरी ती भारत-रशिया संबंधांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची मानली जात आहे.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक घडामोडी, पश्चिम आशियातील अस्थिरता, ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांसारख्या विषयांवर गंभीर चर्चा केली. एस. जयशंकर यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये या चर्चेचा उल्लेख करत या संवादाचा उल्लेख “महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक” असा केला. जयशंकर म्हणाले, “ब्रिक्स 2025 च्या पार्श्वभूमीवर सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत चर्चा होणं आनंददायी ठरलं.”
नव्या BRICS चा विस्तार आणि भारताची भूमिका
या परिषदेत ब्रिक्स गटाचा विस्तार झाल्याचे विशेष वैशिष्ट्य ठरले. यावेळी इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांना नव्या सदस्य देश म्हणून सामील करून घेण्यात आले. या निर्णयामुळे ब्रिक्स आता अधिक व्यापक, बहुपक्षीय आणि जागतिक शक्ती संतुलनाच्या दृष्टिकोनातून प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. या गटात पारंपरिक ब्रिक्स सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्या जोडीला नव्या देशांचा सहभाग भारतासाठी धोरणात्मक संधी निर्माण करणारा ठरतो. भारत यामार्फत अफ्रिका, मध्य पूर्व व दक्षिण आशियातील राष्ट्रांशी सहकार्य अधिक बळकट करू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘400 किमीची रेंज, लक्ष्य होईल नष्ट…’ भारताचा इस्रायलसोबत ‘LORA’ क्षेपणास्त्राचा करार; पाकिस्तान चिंतेत
दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट इशारा
ब्रिक्स परिषदेतील शांतता आणि सुरक्षा सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादासंबंधी आपली भूमिका ठामपणे मांडली. “दहशतवादाविरोधातील लढा ही केवळ परिस्थितीनुसार घेण्यात येणारी भूमिका नसावी, तर ती कायमस्वरूपी आणि तत्त्वाधिष्ठित असावी,” असे मोदी म्हणाले. त्यांनी २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत, “जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे,” असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींच्या या भूमिकेचा स्पष्ट संदेश असा होता की, दहशतवादाच्या प्रश्नावर सर्व देशांनी एकत्र येऊन कठोर आणि सामूहिक भूमिका घेणे आवश्यक आहे.
भारत-रशिया संबंधांचा नवा टप्पा
एस. जयशंकर आणि सर्गेई लावरोव्ह यांच्यातील ही बैठक भारत-रशिया संबंधांना नव्या पातळीवर घेऊन जाणारी ठरू शकते. सध्या रशिया-पश्चिम संघर्ष, युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष अशा पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया यांच्यात अधिक सामंजस्याने संवाद सुरू आहे. दोन्ही देशांना बहुपक्षीय मंचांवरील सहकार्य, आर्थिक देवाणघेवाण आणि ऊर्जा सहकार्य वाढवण्याची गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्याचे भारतावर प्रेम… ! हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावरून पाकिस्तानात वादळ; भुट्टोंच्या विधानावर पेटलं राजकारण
BRICS परिषदेत भारताचा सक्रिय सहभाग
ब्रिक्स परिषदेत भारताचा सक्रिय सहभाग, रशियाशी वाढता राजनैतिक संवाद आणि दहशतवादाविरोधातील पंतप्रधान मोदींची भूमिका – या तिन्ही घटकांनी भारताची जागतिक स्तरावरील छाप आणखी दृढ केली आहे. रशिया आणि भारत यांच्यात वाढणारे सामंजस्य, ब्रिक्सचा विस्तार आणि जागतिक शांततेसाठी दिलेला संदेश हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील परिपक्वतेचे निदर्शक आहेत.