Thailand-Cambodia conflict: थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद शीगेला पोहचला आहे. दोन्ही देशांमधील वाद आता युद्धापर्यंत पोहचला असून काल दोन्ही देशांकडून एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या दोन्ही देशांतील तणावामागे चीनचा हात असल्याचे बोलले जात आहे. चीनच्या कथित भूमिकेमुळे हा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान गोळीबार आणि हवाई हल्ले आहेत. ज्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. हा वाद एका प्राचीन मंदिराच्या नियंत्रणावरून आणि प्रादेशिक प्रभावावरून आहे, ज्यामध्ये अमेरिका आणि चीन दोघांचेही हितसंबंध आहेत.
पृथ्वीवर युद्धाची आणखी एक नवीन आघाडी उघडली आहे. आग्नेय आशियातील दोन देशांमधील युद्ध सुरू झाले आहे. हे दोन देश म्हणजे थायलंड आणि कंबोडिया. थायलंड आणि कंबोडियामध्ये जुना सीमावाद आहे, परंतु या वादाचे युद्धात रूपांतर होण्याची वेळ खूप महत्त्वाची आहे. या युद्धाचा प्रायोजक चीन आहे. चीनला आशियामध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे आणि त्यासाठी तो थायलंडचा वापर करत आहे. २४ जुलै रोजी सकाळी सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर एमएलआरएस हल्ले करत आहेत. थायलंड देखील लढाऊ विमानांनी हल्ले करत आहे. हे युद्ध सुरू करण्यामागील कारण काय आहे आणि चीन त्यातून काय साध्य करू इच्छित आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
२४ जुलै रोजी सकाळी थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमावादामुळे तणाव चिघळला असून दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये गोळीबार सुरू झाला आहे. कंबोडियन सैन्याने मोठ्या प्रमाणात सीमेवर उपस्थित राहून मल्टीपल लॉन्च्ड रॉकेट सिस्टीमद्वारे थायलंडवर हल्ला चढवला. थायलंडच्या तीन प्रांतांवर बारूदाचा मारा झाला असून, सीमेलगतच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. थायलंडच्या हवाई दलानेही प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरू केले असून, एका पेट्रोल पंपावर एफ-१६ मधून बॉम्ब टाकण्यात आला. या संघर्षामागे जुना सीमावाद असून, मे महिन्यातही अशा प्रकारची चकमक झाली होती; मात्र यावेळी ती अधिक तीव्र आणि विनाशकारी आहे.
२४ जुलै रोजी सकाळी दोन्ही देशांच्या सैन्यात पायदळ आणि तोफखान्याची लढाई सुरू झाली आणि थाई हवाई दलाचे हल्ले देखील सुरू झाले. थायलंडच्या सुरिन प्रांत आणि कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे प्रांताच्या सीमेवर हा वाद सुरू झाला. सकाळी ७:३० वाजता, थाई पथकाला ता मुएन थॉम मंदिराभोवती एक कंबोडियन ड्रोन दिसला. दरम्यान, सहा कंबोडियन सैनिक थायलंडच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसले.
सकाळी ८:२० च्या सुमारास, कंबोडियन सैन्याने अचानक थायलंडच्या लष्करी चौकीवर गोळीबार केला. ही पोस्ट ता मुएन थॉम मंदिरापासून थोड्या अंतरावर आहे. सकाळी ९:४० वाजता, कंबोडियातील बीएम-२१ रॉकेट लाँचर्सनी थायलंडच्या अंतर्गत भागांना लक्ष्य केले. यातील अनेक रॉकेट थायलंडच्या सिसाकेट प्रांतातील एका मंदिराजवळ आणि काही निवासी भागात पडले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काही वेळातच, सकाळी ९:५५ वाजता, कंबोडियन सैन्याने थायलंडच्या सुरिन प्रांतातील काप चोएउंग भागात आणखी एक रॉकेट हल्ला केला, ज्यामध्ये तीन नागरिक जागीच ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. सकाळी १०:४८ वाजता, थायलंडने युद्धात ६ एफ-१६ विमाने तैनात केली.
थायलंड व कंबोडियामधील संघर्ष उग्र रूप धारण करत असून, दोन्ही देश एकमेकांवर आधी गोळीबार केल्याचा आरोप करत आहेत. गोळीबारानंतर तणाव वाढून सैन्य थेट तीन प्रांतांमध्ये आमनेसामने आले आहे. दोन्ही देशांनी सीमा सील केल्या आहेत. युद्धाचे मूळ कारण हजार वर्ष जुन्या मंदिरावरील दावा असून, हे मंदिर कंबोडियासाठी पर्यटन उत्पन्नाचा मोठा स्रोत मानले जाते.
या वादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होत असून, अमेरिका थायलंडच्या समर्थनार्थ असून चीन कंबोडियाच्या पाठीशी आहे. थायलंडकडे अमेरिकेची एफ-१६ लढाऊ विमाने असून, कंबोडियाला चीनकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळते. चीनचा ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्प या दोन्ही देशांमधून जात असल्याने चीनचे हितसंबंधही दोन्हीकडे आहेत. शांततेचे आवाहन करत असतानाच चीन कंबोडियाला शस्त्रपुरवठाही करत आहे, त्यामुळे संघर्ष अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
भारत-ब्रिटनमध्ये FTA करारावर स्वाक्षरी; तीन वर्षाच्या दीर्घ चर्चेनंतर ऐतिहासिक करार मुर्तरुपात
आतापर्यंतच्या अहवालांवरून, पहिल्यांदा कंबोडियाच्या बाजूने युद्धास सुरूवात झाली होती आणि चीनच्या मदतीशिवाय कंबोडिया युद्ध सुरू करू शकत नाही. जर दोन्ही देशांची तुलना केली तर थायलंडपेक्षा कंबोडिया खूपच कमजोर आहे. यावरून असे दिसून येते की, इतक्या कमकुवत अवस्थेत असतानाही कंबोडियाने युद्धास सुरूवात केली. जी चीनच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही. युद्ध शांत झाले तरी, भविष्यात दोन्ही देश एकमेकांसाठी धोका निर्माण करू शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संरक्षण बजेट वाढवण्याचा अर्थ असा आहे की थायलंडला एकतर महागडी अमेरिकन शस्त्रे खरेदी करावी लागतील किंवा चीनकडून स्वस्त शस्त्रे खरेदी करावी लागतील. दुसरीकडे, कंबोडियालाही शस्त्रे खरेदी करावी लागतील, ज्यामुळे ते चीनचे कर्जबाजारी होईल. यामुळे दोन्ही देशांमध्ये चीनचे वर्चस्व वाढण्याची खात्री आहे. म्हणूनच जिनपिंग युद्धाचे प्रायोजक आहेत, जेणेकरून आपत्तीला संधीत रूपांतरित करता येईल.