पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय?
‘पश्चिमी विक्षोभ’ हा शब्द ऐकायला जरी तांत्रिक वाटत असला, तरी त्याचा थेट संबंध आपल्या हवामानाशी आहे. पश्चिमी विक्षोभ म्हणजे कॅस्पियन समुद्र किंवा भूमध्य समुद्रात निर्माण होणारे थंड वारे व वादळाचे प्रणाली. हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजेच भारताच्या दिशेने प्रवास करतात. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमार्गे ते भारतात पोहोचतात. यांचा प्रवास अत्यंत थंड वातावरणातून होतो आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात बर्फ व आर्द्रता घेऊन येतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध न होता पराभव! पाकिस्तानच्या सैन्याला जबर धक्का; बलुच बंडखोरांकडून मंगोचरवर ताबा
हवामानावर होणारा परिणाम
हे वारे भारतात पोहोचल्यावर हिमालय पर्वतरांगांमध्ये अडतात. त्यामुळं वाऱ्यांचं अँटीसायक्लोनिक (प्रतिचक्रवातीय) स्वरूप तयार होतं, ज्यामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि अन्य मैदानी भागात पाऊस सुरू होतो. विशेषतः पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या भागांमध्ये याचा मोठा प्रभाव दिसतो. या विक्षोभांमुळे केवळ थंडीच वाढत नाही, तर वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि काही वेळा वीजेचा बिघाड अशा समस्या देखील उद्भवतात. यामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.]
हिवाळ्यातील ठळक प्रभाव
पश्चिमी विक्षोभ हिवाळ्याच्या महिन्यांत अधिक सक्रिय असतो. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान, उत्तर भारतात या विक्षोभांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. या काळात उत्तर भारतातील थंडी वाढते आणि वातावरणात दाट धुके, पावसाचे झार व हिमवृष्टी दिसून येते. जेव्हा हे वारे मध्य आशियातून भारतात येतात, तेव्हा तेथे असलेल्या उष्ण आणि सौम्य वाऱ्यांमुळे त्यांची दिशा आणि गती बदलते. परिणामी, भारतात प्रवेश करताच हे वादळ अधिक तीव्र होतं आणि त्यामुळेच दिल्लीसारख्या मैदानी भागातही तीव्र वादळ आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतो.
विविधतेने भरलेले हवामान – एक नैसर्गिक यंत्रणा
पश्चिमी विक्षोभ हे उष्णकटिबंधीय वादळांपेक्षा वेगळे असते. उष्णकटिबंधीय वादळात आर्द्रता तळाच्या स्तरावर असते, तर पश्चिमी विक्षोभात ती वरच्या थरांतून येते. त्यामुळे याचे परिणाम देखील भिन्न असतात. ज्या दिवशी दिल्लीसारख्या भागांमध्ये वादळ आणि अचानक तापमानात घट दिसते, त्या दिवशी हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पश्चिमी विक्षोभ सक्रिय असतो.
निसर्गाच्या रचनेचा एक महत्त्वाचा भाग
अंततः, पश्चिमी विक्षोभ हा निसर्गाच्या हवामान चक्रातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामुळे उत्तर भारतातील जलसाठ्याला पूरक असणारा पाऊस आणि बर्फ मिळतो, जो शेतीसाठी आणि पाण्याच्या स्रोतांसाठी आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर, या विक्षोभांमुळे उद्भवणाऱ्या वादळांचा योग्यवेळी अंदाज घेणं आणि योग्य ती खबरदारी घेणं हेही तितकंच गरजेचं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S-400 डेटा लीकचा संभाव्य धोका; पाकिस्तान-चीन गुप्त करारामुळे भारताची चिंता वाढली
तापमानात घट
पश्चिमी विक्षोभामुळे भारतात दरवर्षी हवामानात लक्षणीय बदल होतो. तापमानात घट, पावसाचा अंदाज आणि हवामानातील तीव्रतेचा मागोवा घेताना या नैसर्गिक प्रक्रियेचे बारकावे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण, हा वाऱ्यांचा खेळ केवळ हवामान बदलत नाही, तर आपल्या रोजच्या जीवनावरही त्याचा परिणाम होत असतो.