
What is the real reason for the deaths of 700 people in the violence?
Tanzania election protest : टांझानियात नुकत्याच राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत 98% मतं मिळवत सामिया सुलुहू हसन यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रोमांचक विजय मिळवला. या विजयानंतर सर्वत्र एकच जल्लोष सुरु होता. मात्र, या जल्लोषाला विरोधकांकडून सुरुंग लावण्यात आला. एकीकडे विजय साजरा करण्यासाठी आतिषबाजी केली जात होती तर दुसरीकडे गोळीबार सुरु असल्याने अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टांझानियाच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन यांना झालेल्या निवडणुकीत तब्बल 3.2 कोटी मतदानांपैकी त्यांना जवळपास 98% मतं एकट्याला मिळाली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज केली. ज्यामुळे त्यांना काही वेळ अजून सत्तेत राहायला मिळाले. मात्र, या अनपेक्षित निकालामुळे विरोधकांमध्ये प्रचंड संताप उसळला. विरोधकांच्या टीकांमुळे राष्ट्रपती पदासाठी झालेली ही निवडणुका वादग्रस्त ठरली. ज्यामुळे संपूर्ण देशभर हिंसाचार उफाळून आला.
हेही वाचा : Indian Navy: चिनी युद्धनौका भारतीय नौदलाच्या रडारवर; नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सायन यांचा मोठा खुलासा
निवडणूक आयोग आयुक्त जेकब म्वामबेगले यांनी माध्यमांशी सवांद साधताना चामा चा मपिंदुजी पक्षाने विजयाचा झेंडा फडकवल्याची घोषणा केली. परंतु, हा निकाल विरोधकांच्या पचनी न पडल्याने त्यांनी निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला. लोकशाही असलेल्या देशात एकाच व्यक्तीला 98% मतं ही अशक्य गोष्ट असल्याचे तिथल्या जनतेने म्हंटले आहे. तसेच, ही निवडणुक पारदर्शकपणे लढली गेली आहे का? असा ही प्रश्न आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांनी उपस्थित केला आहे. निवडणूक सुरु असताना सर्वत्र भीतीचे वातावरण होते, आणि ही गांभीर्याची बाब असून टांझानियाच्या लोकशाहीत हा काळा डाग असल्याचे मत अनेक पर्यवेक्षकांनी नोंदवले आहे.
मुख्य विरोधीपक्ष चडेमा पार्टीने असे सांगितले की, या निकालानंतर गेल्या तीन–चार दिवसात देशभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. ज्यात देशातील 700 जणांचा गोळीबारात मृत्यू झाला. देशाची राजधानी डोडोमा तसेच, दार एस सलाम या आथिर्क राजधानीवर आणि वायव्य शिनयांगा या भागात नागरिकांवर सैन्याने बेछूट गोळीबार केला असून, काही ठिकाणी तर अश्रूधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले. सद्यस्थितीची परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा टांझानिया सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, हिंसाचाराचे फोटो वेगाने पसरत असून तेथील हिंसाचाराची तीव्रता अधिक स्पष्ट दिसून येत आहे.
हेही वाचा : धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?
देशातला वाढलेला हिंसाचार पाहून संयुक्त राष्ट्राने एक निवेदन जारी केलंय. ज्यात देशातील हिंसाचारात झालेल्या मृत्यूंसंदर्भात अहवाल मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “टांझानियात निवडणुकीच्या निकालावरून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे आम्ही चिंतेत असून, या हिंसाचारात काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस सुरक्षा दलांनी घातक शस्त्रांचा वापर टाळावा, असं आवाहन करतो. देशातील तणाव संपवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आंदोलकांनी शांतीचा मार्ग स्वीकारावा” असं निवेदनात संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.