Pakistan terrorists via Nepal
Open Nepal Border : भारताला सतत त्रास देणारा आणि असंख्य जीव घेतलेला दहशतवाद आता नव्या मार्गाने भारतात घुसखोरी करत आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चे तीन दहशतवादी उस्मान, हसनैन अली आणि आदिल हुसेन अलीकडेच नेपाळमार्गे भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिस मुख्यालयाने याबाबत हाय अलर्ट जारी केला असून या तिघांचा शोध सुरू आहे. हा प्रकार नवीन नाही. २०१३ पासून आतापर्यंत नेपाळमार्गे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न अनेक दहशतवाद्यांनी केला आहे. यामध्ये यासीन भटकळ, अब्दुल करीम टुंडा आणि तहसीन अख्तर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो नेपाळमार्गेच भारतात घुसणे दहशतवाद्यांसाठी सोपे का आहे?
भारताची सीमा सात देशांशी लागून आहे. यामध्ये चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यासोबत सर्वाधिक किलोमीटरची सीमा सामायिक आहे. पण भारत-नेपाळ सीमा १७५१ किमी लांब असून ती पूर्णपणे खुली आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही तीन राज्ये नेपाळशी सरळ जोडलेली आहेत. या सीमांवर कुंपण नाही. त्यामुळे जंगलातून, नदीमार्गे किंवा लहान पायवाटांमधून कोणीही सहज भारतात शिरू शकतो.
नेपाळ आणि भारतामध्ये पारंपरिक कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाती आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर फक्त सीमाशुल्क तपासणी आणि सीमा सुरक्षा दलाचे पथक असते. पण त्यांचे मुख्य काम बेकायदेशीर व्यापार थांबवणे हे आहे. अशा परिस्थितीत दहशतवादीही सामान्य प्रवाशांमध्ये मिसळून सहज सीमेपार जातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL
१. पाकिस्तान-नेपाळ संबंध : पाकिस्तानचे नेपाळसोबत अजूनही औपचारिक संबंध टिकून आहेत. पाकिस्तानी नागरिक पर्यटक व्हिसावर नेपाळात सहज येऊ शकतात. इथून दहशतवादी भारतात प्रवेश करतात.
२. बनावट नेपाळी पासपोर्ट : अनेक दहशतवादी पकडले गेल्यावर त्यांच्याकडे नेपाळी पासपोर्ट सापडले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की नेपाळात आल्यावर त्यांना स्थानिक नेटवर्कच्या मदतीने बनावट पासपोर्ट मिळतात. त्यामुळे ते सहज भारतीय सीमेकडे जाऊ शकतात.
३. तस्करी नेटवर्क : भारत-नेपाळ सीमारेषेवर दारू, ड्रग्ज, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. हे तस्कर दहशतवाद्यांना गुपचूप भारतात पोहोचवण्यात मदत करतात. २०२३ मध्येच अशा तस्करीत सामील २,२४१ लोकांना अटक करण्यात आली होती.
१९९९ कंधार अपहरण : काठमांडूहून दिल्लीला येणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. या घटनेनंतर भारताला मसूद अझहरसह तीन दहशतवादी सोडावे लागले.
२०१३ : इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ नेपाळ सीमेवरून पकडला गेला. त्याच्यावर भारतातील अनेक बॉम्बस्फोटांचे आरोप आहेत.
२०१६ नागरोटा हल्ला : जम्मूतील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी नेपाळमार्गे भारतात शिरला होता.
ही काही उदाहरणे आहेत, जी दाखवतात की नेपाळमार्गे घुसखोरी किती धोकादायक ठरते.
भारत-नेपाळ सीमा फक्त भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही संवेदनशील आहे. हजारो कुटुंबे दररोज या सीमेतून दोन्ही बाजूंना प्रवास करतात. त्यामुळे पूर्णपणे सीमेवर बंदोबस्त ठेवणे कठीण आहे. पण त्याच वेळी दहशतवाद्यांचा सतत वाढणारा धोका भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. विशेषतः बिहारमधील किशनगंज, अररिया आणि मधुबनी या भागांत तस्कर आणि घुसखोरांची हालचाल जास्त दिसते. बिहार पोलिसांनी याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Minneapolis school shooting : अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबार; मिनियापोलिस येथील हृदयद्रावक घटनेने देश हादरला
भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा अनुभव दशकांपासून घेतला आहे. आता या कारवायांना नेपाळमार्गे नवीन शिरकाव मिळत आहे. उघडी सीमा, सैल तपासणी आणि तस्करांचे जाळे यामुळे भारतासाठी हा सर्वात मोठा सुरक्षा धोका बनत आहे. आज जेव्हा जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसल्याची माहिती मिळते, तेव्हा हा प्रश्न अधिक गंभीर होतो भारताच्या सुरक्षेसाठी नेपाळमार्गे होणारी घुसखोरी रोखणे कितपत शक्य आहे?