Will the world be destroyed 2024 YR4 asteroid could hit Earth by 2032, astronomers warn
नवी दिल्ली: भूतकाळात पृथ्वीवर अनेकदा लघुग्रह कोसळले असून, त्याचे परिणाम विनाशकारी ठरले आहेत. 1908 मध्ये रशियाच्या सायबेरियन भागात कोसळलेल्या एका मोठ्या लघुग्रहाने जवळपास 2000 चौरस किलोमीटर क्षेत्र नष्ट केले होते. सुदैवाने, सायबेरियाच्या या भागात विरळ वस्ती होती यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो झाडे आणि वनस्पती जळून खाक झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा शास्त्रज्ञांनी अशाच एका लगुग्रहाचा धोकादायक इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगान सरकत असून खगोलशास्त्रज्ञ हाय अलर्ट मोडवर आहेत. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, 2024 YR4 नावाच्या नव्या लघुग्रह 2032 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यामुळे पृथ्वीवर गंभीर परिणाम होऊ शकतात असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
2024 YR4 क्षुद्रग्रहाचे स्वरूप आणि धोका
युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या प्लॅनेटरी डिफेन्स ऑफिसने या लघुग्रहाचा शोध लावला आहे. ESA ने दिलेल्या अहवालानुसार, 22 डिसेंबर 2032 रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची 99% शक्यता आहे. मात्र, 1% शक्यता ही थेट पृथ्वीवर आदळण्याची असून, याला पूर्णतः नाकारणे अशक्य आहे. वैज्ञानिकांनी या लघुग्रहाच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. तो कुठल्या दिशेने प्रवास करत आहे, याचा अभ्यास सध्या केला जात आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) एका खगोलशास्त्रज्ञाने देखील या लघुग्रहाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे आणि संपूर्ण जगभरातील वेधशाळांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो.
पृथ्वीवर काय परिणाम होऊ शकतो?
जर 2024 YR4 लघुग्रह पृथ्वीवर आदळला, तर याचा परिणाम भयानक असू शकतो. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, त्याचा प्रभाव पश्चिम-मध्य अमेरिका, उत्तर-दक्षिण अमेरिका, मध्य अटलांटिक महासागर आणि आफ्रिकेच्या काही भागांपासून भारतापर्यंत असलेल्या संकुचित पट्टीमध्ये जाणवू शकतो. मात्र, निश्चितपणे हे सांगणे अजून कठीण आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
हे लक्षात घेऊन, अंतराळ संशोधन संस्थांनी हा लघुग्रह सतत निरीक्षणाखाली ठेवला आहे. आज बदलत्या प्रगत तंत्रज्ञानामुळे अशा अंतराळीय वस्तूंची अचूक माहिती मिळवणे शक्य झाले आहे. यामुळे भविष्यातील अशा संभाव्य धोक्यांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी संशोधन सुरु आहे.
पृथ्वीच्या संरक्षणासाठी उपाययोजना
नासासह (NASA) विविध जागतिक संस्था अशा संकटांना टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय शोधत आहेत. भविष्यात जर हा लघुग्रह खरोखरच धोकादायक ठरला, तर त्याचा मार्ग बदलण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले जाईल अशा अपेक्षा आहे. अद्याप याबाबत निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, भविष्यात अशा आपत्तींपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी विज्ञान मोठी भूमिका बजावणार आहे.