सुनिता विल्यम्सच्या जिद्दीला सलाम; अंतराळमध्ये महिनोमहिने अडकूनही रचला 'हा' इतिहास
वॉशिंग्टन: भारतीय वंशाच्या अमेरिकन अतंराळवीर सुनिता विल्यमस् यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अवकाशात ६२ तास ६ मिनिटे स्पेसवॉक केला आणि इतर महिला अंतराळवीरांना मागे टाकत सर्वाधिक वेळ स्पेसवॉक केल्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी अतंराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नावावर होता, ज्यांनी 60 तास 21 मिनिटे अंतराळात वॉक केला होता. आता सुनिता विल्यम्सचे नाव नासाच्या सर्वकालीन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
स्पेसवॉकचा वेळ
सुनिता विल्यम्स यांनी अमेरिकी वेळेनुसार, सकाळी 7:43 ला स्पेसवॉक सुरु केला आणि त्यानंतर 1: 09 वाजता संपला. ही स्पेसवॉक मोहीम एकूण 5 तास 26 मिनिटे चालली आणि सुनिता विल्यम्स यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला.
NASA astronaut Suni WIlliams just surpassed former astronaut Peggy Whitson’s total spacewalking time of 60 hours and 21 minutes today. Suni is still outside in the vacuum of space removing radio communications hardware. Watch now on @NASA+… https://t.co/OD43nAlf5m pic.twitter.com/N5Mr0qQWJP
— International Space Station (@Space_Station) January 30, 2025
सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) बाहेर जाऊन महत्त्वाची कामे पूर्ण केली. त्यांनी खराब झालेले रेडिओ कम्युनिकेशन हार्डवेअर काढून टाकले, तसेच वैज्ञानिक प्रयोगांसाठी आवश्यक असलेले सूक्ष्मजीव नमुने गोळा केले. हे नमुने अंतराळातील सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वावर संशोधन करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
मोहिमेतील अडचणींमुळे परतण्यास विलंब
जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून सुनीता विल्यम्स आणि विल्मोर ISSवर पोहोचले होते. ही मोहिम केवळ 8 दिवसांची होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक काळ अंतराळात राहावे लागले. स्टारलाइनरला हेलियम गळती आणि थ्रस्टर बिघाड यासारख्या समस्या आल्याने अंतराळयान परतीसाठी सुरक्षित राहिले नाही. त्यामुळे नासाने आता दोन्ही अंतराळवीरांना मार्च 2025 अखेरीस स्पेसएक्सच्या अंतराळयानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्स कंपनीवर सोपवली आहे.
तांत्रिक आव्हानांना न जुमानता, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी आपले वैज्ञानिक कार्य सुरू ठेवले आहे. नासा आणि अवकाश विज्ञान क्षेत्रासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. दीर्घकाळ अंतराळात राहण्यामुळे तांत्रिक समस्या सोडवण्यास मदत होते, तसेच भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी उपयुक्त माहिती मिळते. सुनीता विल्यम्स यांचा हा विक्रम भविष्यातील अंतराळ संशोधनाला नवीन दिशा देईल आणि अंतराळ क्षेत्रातील वैज्ञानिकांना नवीन अंतर्दृष्टी मिळवून देईल.