
जगभरातील तंत्रज्ञान ऑटोमोबाईल क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. वेगवेगळ्या इंधन पर्यायाचे शोध, जास्तीत जास्त चांगले आणि टिकाऊ इंजिनाच्या गाड्या, आधीपेक्षा जास्त आरामदायक, सोयीस्कर वाहने या सर्वातच ऑटोमोबाईल क्षेत्र अगदी झपाट्याने प्रगती करत आहे. या पप्रगतीचा एक उच्चांक म्हणजे स्वयंचलित (Autonomous) वाहने. ज्या वाहन उद्योगाची पायाभरणी टांगा, घोडागाडी सारख्या वाहनांपासून झाली, त्या वेळच्या लोकांना कोणी सांगितले असते कि विना चालाकाचीही गाडी रस्त्यांवर आरामात धावू शकते. तर नक्कीच त्यांना या गोष्टीवर कधीच विश्वास बसला नसता.
भारतही तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर आहेच. पण खरोखरच भारतातील रस्ते, लोक, वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक कोंडी स्वयंचलित वाहनांना वापरण्यासाठी किती तयार आहे किंवा नाही हा मोठा गहन प्रश्न उभा आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण इथे पाहणार आहोत.
भारतात ‘या’ कंपनीची Self Driving Car लाँच, खर्च करावे लागणार ‘इतके’ लाख …
भारतातील रस्ते
रस्ते हा भाग स्वयंचलित वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या बऱ्याच ग्रामीण किंवा शहरी भागातही रस्त्यांची अवस्था प्रत्येक ठिकाणी चांगली आहेच असे नाही. चांगल्या आणि व्यवस्थित मार्किंग केलेल्या रस्त्यांवर स्वयंचलित वाहने चांगल्या प्रकारे चालू शकतात. पण आपल्याकडचे बरेच रस्ते माणसांनाही गोंधळात टाकू शकतात, अशा वेळी एक सेंसर प्रणाली नीट काम करू शकेलच हे सांगता येत नाही.
रस्त्यांवरची वाहतूक
जरी स्वयंचलित वाहनांमध्ये अंतर,वेग मापण्यासाठी सेंसर प्रणाली असली तरी ती एका प्रमाणीत संयोगांमध्ये काम करू शकते. भारतातील रस्त्यांवर एकाच वेळी मोटरसायकली, सायकल, कार, मोठे डम्पर तर चालणारे लोकही एकाच वेळेवर असतात. आणि या सगळ्यांच्या गाडी चालवण्याच्या शक्यता स्वयंचलित प्रणालीला एकाच वेळी लावणे शक्य नसते. त्यात आपल्याकडे कोणी कसे गाडी चालवेल, रस्त्याने कसे चालेल याचा नेम नसतो, त्यामुळे या गोष्टीमुळेही स्वयंचलित वाहनांना भारतात अजूनही लाल झेंडाच दिसतोय.
हायफाय टेक्नॉलॉजी आली अंगाशी! चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारमुळे जोरदार राडा
वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक कोंडी
भारतातील शहरांची वाहतूक व्यवस्था भारतातील लोकांनीच अशी बनवून ठेवली आहे कि कधी कधी लोकही त्याचा तर्क लावू शकत नाहीत. उदाहरण म्हणजे सिग्नल असताना सिग्नल तोडून जाने, चुकीचा इंडिकेटर दाखवून दुसरीकडेच जाने, इंडिकेटर न दाखवता लेन बदलने असे आणि इतर बरेच. या गोष्टीमुळेही स्वयंचलित वाहनाला भारतातील रस्त्यांवर काम करणे खूप अवघड जाऊ शकते. शिवाय मोठ्या शहरांतील वाहतूक कोंडीचा प्रश्नही चव्हाट्यावर आहे. ज्या पद्धतीने लोक वेडीवाकडी गाडी घालून ट्राफिक मधून निघण्याचा प्रयत्न करतात तो एकतर स्वयंचलित वाहनाला शक्य वाटत नाही आणि झालाच तर वाहनाला दुसऱ्या वाहनांकडून हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
एकूण पाहायचे तर भारताला स्वयंचलित वाहने घेण्यासाठी देशाच्या रस्त्यांच्या अवस्थेवर, लोकांच्या वाईट सवयींवर आणि वाहतुकीच्या शिस्तीवर, नियमांवर काम करायला हवे हेच नक्की.