
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भारतीय बाजारात नवीन वाहनांची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. ग्राहकांच्या याच उत्साहाला लक्षात घेऊन बजाज ऑटो सज्ज झाली आहे. नुकतीच Pulsar N160 S, N160 SS आणि पल्सर १२५ व १५० च्या नवीन जनरेशन मॉडेलसह चार नवीन बाईक्स लाँच केल्यानंतर, कंपनी आता पुढील ४५ दिवसांत आणखी सहा नवीन मोटरसायकल बाजारात आणणार आहे.
कंपनीच्या या धडाकेबाज नियोजनाबाबत बोलताना, बजाज ऑटोचे मार्केटिंग प्रेसिडेंट सुमीत नारंग यांनी सांगितले की, “आमच्या १५० आणि १२५ च्या लाँचिंगनंतर आम्ही लवकरच पुन्हा नवीन उत्पादनांसह भेटीला येत आहोत.” पल्सरच्या ‘एन’ (N) आणि ‘क्लासिक’ श्रेणी अपडेट केल्यानंतर, आता कंपनी ‘एनएस’ (NS) सिरीज सेगमेंट मध्ये आणण्याची शक्यता आहे.
Bajaj Auto: बजाज ऑटोची सणासुदीची मोठी तयारी! ३ नवी प्रोडक्ट्स आणि २ नवीन ब्रँड्स होणार लाँच!
नवीन लाँच होणाऱ्या ६ मोटारसायकलबाबत सविस्तर माहिती,
अपडेटेड पल्सर एनएस मालिका: पल्सर पोर्टफोलिओमध्ये ओरिजिनल, एन (N) आणि एनएस (NS) असे तीन स्पष्ट प्लॅटफॉर्म असल्याचे नारंगांनी स्पष्ट केले आहे. एनएस मालिकेत १२५ सीसी ते ४०० सीसी पर्यंतचे चार मॉडेल्स आहेत. नुकतीच पल्सर एनएस४००झेड (NS400Z) अपडेट झाली असल्याने ती तशीच राहण्याची शक्यता आहे, तर पल्सर एनएस१२५, एनएस१६० आणि एनएस२००० चे नवीन अपडेटेड अवतार लवकरच पाहायला मिळू शकतात.
बजाजची पहिली ॲडव्हेंचर बाईक: बजाज भारतात आपली पहिली ड्युअल-स्पोर्ट ॲडव्हेंचर मोटरसायकल लाँच करणार आहे, जी ब्राझीलसह अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये देखील विकली जाईल. टेस्ट ड्राईव्ह दरम्यान दिसलेली ही बाईक ऑक्टोबर २०२६ मध्ये जागतिक स्तरावर पदार्पण करणार असून बाजारात ती थेट हिरो एक्सपल्स २१० ला टक्कर देईल.
ट्रायम्फ बॉन्नेव्हिल ४०० (Triumph Bonneville 400): ट्रायम्फ ४०० मालिकेतील सातवी मोटरसायकल म्हणून लहान ३५० सीसी इंजिनसह ‘बॉन्नेव्हिल ४००’ लाँच केली जाणार आहे. भारतीय रस्त्यांवर दिसलेली ही बाईक पुढच्या महिन्यात लाँच होऊ शकते. ही बाईक गेल्या अनेक वर्षांपासून ३५० सीसी सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ला थेट स्पर्धा देईल.
उत्पादन क्षमता वाढवण्याचे नियोजन
या नवीन मोटरसायकलच्या उत्पादनासाठी बजाज ऑटो आपली एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ७२ लाख युनिट्सवरून वाढवून ९० लाख युनिट्सपेक्षा जास्त करण्याच्या तयारीत आहे. या वाढीव क्षमतेचा वापर नवीन वाहनांच्या निर्मितीसाठी केला जाणार असून, कंपनी यासाठी नवीन ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा शोध घेत आहे आणि ब्राउनफिल्ड विस्ताराचा विचार करत आहे. तरी, नवीन फॅक्टरीची जागा आणि गुंतवणुकीबाबतची घोषणा अद्याप झालेली नाही.