
व्हिएतनामची इलेक्ट्रिक वाहन कंपनी व्हिनफास्ट (VinFast) आता भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने भारतातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 हून जास्त डीलरशिप उभारण्यासाठी भागीदारांसोबत सामंजस्य करारपत्रे (LOI) केली आहेत. या प्रस्तावित नेटवर्कमध्ये 34 शहरांचा समावेश असून, इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सच्या विक्रीसोबत चार्जिंग सुविधा आणि विक्रीनंतरची सेवा देण्यावर कंपनीचा भर असेल.
व्हिनफास्टने 8 ऑक्टोबर 2026 रोजी व्हिएतनाममधील हाय फोंग येथील आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये भारतीय डीलर भागीदारांसोबत हे करार केले. कंपनीने 2025 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये प्रवेश केला होता. आता चारचाकी वाहनांपलीकडे जात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्येही आपले स्थान निर्माण करण्याची तिची योजना आहे.
अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु
कोणत्या राज्यांमध्ये उभारणार डीलरशिप?
व्हिनफास्टच्या प्रस्तावित नेटवर्कमध्ये उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि राजस्थानचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही कंपनी आपले शोरूम उभारण्याची योजना आखत आहे. पश्चिम भारतात महाराष्ट्र आणि गुजरात, तर दक्षिणेत तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे. पूर्व भारतात पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांचाही समावेश आहे.
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटवर लक्ष
कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतात 2.14 कोटी टू-व्हीलर नोंदणी झाल्या. त्यापैकी इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा वाटा 6.54% होता. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्ससाठी भारतात विस्ताराची संधी असल्याचे कंपनीला वाटते. या सेगमेंटमध्ये आधीपासून अनेक कंपन्या स्पर्धा करत असल्याने व्हिनफास्टला किंमत, रेंज, चार्जिंग आणि सर्व्हिस नेटवर्क या बाबींवर लक्ष द्यावे लागेल.
Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
चार्जिंग आणि सर्व्हिस सुविधांवरही भर
व्हिनफास्ट इंडिया ई-स्कूटर्सचे सीईओ अनुराग सक्सेना यांच्या मते, 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 शहरांत 50 हून जास्त डीलर भागीदारांसोबत काम सुरू करणे हा कंपनीच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहकांना वाहन खरेदी केल्यानंतरही योग्य मदत मिळावी, यासाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस मजबूत करण्याची योजना आहे.
सध्या हे करार प्रस्तावित डीलरशिप नेटवर्कसाठी आहेत. त्यामुळे सर्व शोरूम सुरू झाल्याचे समजू नये. प्रत्यक्षात विक्री कधी सुरू होईल, कोणती मॉडेल्स भारतात येतील आणि त्यांची किंमत किती असेल, याची माहिती कंपनीकडून पुढे स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.