नवीन GST Rates मुळे 'या' दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड
सणासुदीच्या सिझनच्या प्रारंभासोबतच दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली असून, हिरो मोटोकॉर्पने मागणीत विक्रमी वाढ नोंदवली आहे. यंदाचा सिझन ग्राहकांसाठी अधिक खास ठरत आहे, कारण दुचाकी वाहनांवरील जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे प्रथमच वाहन खरेदी करणाऱ्यांवरील कराचा मोठा भार हलका झाला आहे. विशेषतः 100 सीसी व 125 सीसी कम्युटर सेगमेंटला या निर्णयाचा सर्वाधिक फायदा झाला आहे.
ग्राहकांचा वाढलेला उत्साह थेट विक्रीच्या आकडेवारीत परावर्तित होत असून, देशभरातील डीलरशिपमध्ये व्यवहार आणि चौकशीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत अनेक पटींनी वाढ झाली आहे. शोरूममधील गर्दी 50 टक्क्यांहून अधिक वाढल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी
हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा यांनी सांगितले, “यंदाच्या सणासुदीच्या काळात ‘ऑन-द-स्पॉट’ खरेदीत भरीव वाढ दिसून येत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शोरूममधून झालेली टू-व्हीलर खरेदी मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक होती. जीएसटी 2.0 मधील नवीन दररचनेची प्रतीक्षा संपल्यानंतर ग्राहकांनी खरेदीचा निर्णय तत्काळ घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.”
हिरो मोटोकॉर्पने सणासुदीच्या निमित्ताने बाजारात आणलेल्या 12 स्कूटर आणि मोटरसायकल मॉडेल्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल चौकशी आणि ऑनलाइन शोध यात तब्बल 3 पट वाढ झाल्याचेही कंपनीने सांगितले.
ग्राहकांना 100 टक्के जीएसटी कपातीचा लाभ देण्याबरोबरच, हिरोने हिरो गुडलाइफ फेस्टिव कॅम्पेनअंतर्गत प्रथमच खरेदी करणाऱ्यांसाठी अतिरिक्त ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ‘आया त्यौहार, हिरो पे सवार’ या अभियानांतर्गत प्रत्येक नवीन ग्राहकाला 100 टक्के कॅशबॅक, सोन्याची नाणी आणि इतर विशेष लाभ मिळण्याची संधी देण्यात आली आहे.
रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी
डेस्टिनी 110, झूम 160, ग्लॅमर एक्स 125 आणि एचएफ डिलक्स प्रो यांसारख्या नव्या मॉडेल्ससह हिरो मोटोकॉर्पने आपला पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता कंपनीने उत्पादनात वाढ केली असून, लोकप्रिय मॉडेल्सचा साठा संपणार नाही याची खात्री केली आहे. येत्या काही आठवड्यांत विविध रंग आणि पर्यायांसह सातत्याने पुरवठा करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.