फोटो सौजन्य: @MoreMotorcycles/x.com
भारतात बजेट फ्रेंडली बाईक्सना नेहमीच मागणी मिळताना दिसते. मात्र, असे असले तरी आजही हाय परफॉर्मन्स बाईकचा एक वेगळा चाहतावर्ग पाहायला मिळतो. अनेक रायडर्स आणि साहसी राइड करणाऱ्या लोकांच्या कलेक्शनमध्ये हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूक असणाऱ्या बाईक पाहायला मिळतात.
भारतात पॉवरफुल बाईक लाँच करणाऱ्या अनेक बाईक उत्पादक कंपन्या आहेत. Kawasaki ही त्यातीलच एक कंपनी. नुकतेच कावासाकीने त्यांच्या पॉवरफुल बाईक Kawasaki Ninja ZX-10R चे 2026 चे व्हर्जन भारतात लाँच केले आहे. बाईकमध्ये तेच जुने 998 सीसी, इनलाइन-फोर इंजिन वापरले गेले आहे. यासोबतच, उर्वरित फीचर्स देखील पूर्वीसारखेच आहेत. कावासाकी निन्जा ZX-10R मध्ये कोणते खास फीचर्स येतात त्याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.
2026 कावासाकी निन्जा ZX-१०R मध्ये प्रामुख्याने काही किरकोळ परफॉर्मन्स बदल आणि किंमत वाढ दिसून आली आहे. मागील मॉडेलने रॅम एअरसह सुमारे 200 एचपी पॉवर आणि 114.9 एनएम टॉर्क जनरेट केला होता. तर 2026 मॉडेलच्या पीक परफॉर्मन्समध्ये थोडीशी घट झाली आहे.
2026 च्या मॉडेलमध्ये रॅम एअरसह 202 एचपी आहे, परंतु त्याशिवाय, बाईकची सामान्य वापरण्यायोग्य शक्ती सुमारे 193.3 एचपी पर्यंत कमी होते. यासह, ती सुमारे 112 एनएम टॉर्क जनरेट करते. एका साध्या गणनेवरून असे दिसून येते की रॅम एअर विचारात न घेता, बाईकचा टॉर्क सुमारे 2.9 एनएम आणि कमाल पॉवर सुमारे 7 एचपीने कमी झाला आहे.
2026 Kawasaki Ninja ZX-10R ची किंमत 99,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. पूर्वी याची एक्स-शोरूम किंमत 18.50 लाख रुपये होती. किंमत वाढल्यानंतर, तिची नवीन एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख रुपये झाली आहे.
कावासाकी निन्जा ZX-10R चे बहुतेक पार्टस पूर्वीसारखेच आहेत. यात शोवा BFF फ्रंट फोर्क्स, BFRC रियर मोनोशॉक, ड्युअल 330mm फ्रंट डिस्क आणि सिंगल 220mm रियर डिस्क ब्रेक आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मल्टिपल रायडिंग मोड्स, फुल-टीएफटी डिस्प्ले, लाँच कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखी वैशिष्ट्ये पूर्वीसारखीच उपलब्ध आहेत. याशिवाय, 17-इंच व्हील्स, 835mm सीट हाइट आणि 17-लिटर फ्युएल टॅंक देखील पूर्वीसारखीच आहे.