
लक्झरी कारांच्या जगात मर्सिडीझबेंझ S-Class हे नाव नेहमीच तंत्रज्ञान, आराम आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. अनेक दशकांपासून ही कार जगभरातील उद्योगपती, राजकारणी आणि उच्चभ्रू ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. आता Mercedes-Benz ने भारतीय बाजारपेठेत S-Class च्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत S 450 e प्लग-इन हायब्रिड (PHEV) व्हेरियंट सादर केला आहे. विशेष म्हणजे, भारतातील S-Class मालिकेत प्रथमच प्लग-इन हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
मर्सिडीझबेंझ च्या मते, सध्याच्या S-Class पिढीतील हे सर्वात मोठे मिड-लाइफ अपडेट मानले जाते. S 450 e ची किंमत लॉन्च एडिशनसाठी 2.20 कोटी रुपये आणि Manufaktur एडिशनसाठी 2.38 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या कारचे बुकिंग देशभर सुरू झाले असून ग्राहकांना डिलिव्हरी 2026 च्या अखेरच्या तिमाहीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. या लक्झरी सेडानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची 115 किलोमीटरपर्यंतची केवळ इलेक्ट्रिक मोडमधील ड्रायव्हिंग रेंज. 22 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आणि 120 kW इलेक्ट्रिक मोटर यांच्या मदतीने ही कार दैनंदिन प्रवास पेट्रोलशिवाय पूर्ण करू शकते. इलेक्ट्रिक मोटर स्वतंत्रपणे 163 hp शक्ती आणि 440 Nm टॉर्क निर्माण करते.
अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन
बॅटरीची ऊर्जा कमी झाल्यानंतर मर्सिडीज बेंझ नवीन 3.0 लिटर M256 इनलाइन-सिक्स टर्बो पेट्रोल इंजिन कार्यरत होते. हे इंजिन 326 hp शक्ती आणि 540 Nm टॉर्क निर्माण करते. इलेक्ट्रिक मोटर आणि 9G-Tronic ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या साहाय्याने एकत्रित आउटपुट तब्बल 435 hp आणि 680 Nm पर्यंत पोहोचते. त्यामुळे ही कार अवघ्या 5.7 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. नवीन S 450 e मध्ये 2,700 हून अधिक घटकांचे पुनर्रचना आणि अपग्रेड करण्यात आले आहेत. मोठी प्रकाशित फ्रंट ग्रिल, मायक्रो-LED हेडलॅम्प्स, 600 मीटरपर्यंत प्रकाश फेकण्याची क्षमता आणि नव्या डिझाइनचे टेललॅम्प्स यामुळे तिचा प्रीमियम लूक अधिक उठून दिसतो.
इंटिरियरमध्ये MB.OS आधारित नवीन डिजिटल आर्किटेक्चर, AI-सक्षम MBUX व्हॉइस असिस्टंट गुगल maps नेव्हिगेशन आणि MBUX सुपरस्क्रीन देण्यात आला आहे. एअर सस्पेन्शन, रिअर-व्हील स्टीअरिंग आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज घेऊन स्वतःला जुळवून घेणारी सस्पेन्शन प्रणाली यामुळे प्रवास अधिक आरामदायी बनतो. सुरक्षेच्या बाबतीतही S 450 e ने नवा मापदंड निर्माण केला आहे. भारतात प्रथमच S-Class मध्ये 15 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. यासोबतच प्री-सेफ बेल्ट टेन्शनिंग आणि प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
पेट्रोल, पूर्ण इलेक्ट्रिक आणि आता प्लग-इन हायब्रिड अशा तीन पर्यायांसह Mercedes-Benz ने भारतीय लक्झरी वाहन बाजारात आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि आलिशान अनुभव यांचे उत्तम मिश्रण म्हणून S 450 e कडे पाहिले जात आहे.