
'मेड इन इंडिया' मिनी कंट्रीमॅनसी भारतात सादर; किंमत घ्या जाणून सविस्तर
पुणे : मीनी इंडियाने आपली नवी एसयुव्ही मीनी कंट्रीमॅन सी भारतात सादर केली आहे. ही गाडी आता “मेड इन इंडिया” म्हणून चेन्नई येथील बीएमडब्लू ग्रुपच्या प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर तयार केली जाणार आहे. या मॉडेलचे बुकिंग सर्व अधिकृत मीनी डीलर्सकडे सुरू करण्यात आले असून, डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.
बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ हरदीप सिंग ब्रार यांनी सांगितले की, नवीन मीनी कंट्रीमॅनसी ही आधुनिक काळातील मोठ्या एसयुव्ही सेगमेंटमधील एक वेगळा अनुभव देणारी गाडी आहे. पारंपरिक मीनी डिझाइनला एसयुव्ही स्वरूपात सादर करताना ‘गो-कार्ट फिलिंग’ची ओळख कायम ठेवण्यात आली असून ही गाडी साहसी प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारतात उत्पादन झाल्यामुळे कंपनीच्या पोर्टफोलिओला बळकटी मिळेल तसेच ग्राहकांना अधिक चांगल्या किमतीत उत्पादन उपलब्ध करून देता येईल. मीनी ही आजच्या शहरी ग्राहकांसाठी एक आधुनिक आणि प्रीमियम ब्रँड म्हणून विकसित होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
किंमत आणि वित्तीय सुविधा
नव्या मीनी कंट्रीमॅनसी ची एक्स-शोरूम किंमत ४७.५० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. BMW India Financial Services मार्फत ग्राहकांना आकर्षक वित्तीय योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये शून्य डाऊन पेमेंट आणि सुमारे 56,990 रुपये मासिक हप्ता अशा सुविधा दिल्या जात आहेत. तसेच तीन वर्षापर्यंत वाहन विकल्यास 66 टक्के बायबॅक मूल्य देण्याची योजना देखील जाहीर करण्यात आली आहे.