फोटो सौैजन्य iStock
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ॠता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत. तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र, त्याचे कोणतेही सोयरसुतक सरकारला नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात , गाड्या घ्या..! सायकली द्या; महागाई कशासाठी..! गद्दारांच्या सोयीसाठी; 50 खोके महागाई OK; महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी; बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार; सरकार खाते पेट्रोल वर दलाली.. डायन झाली महागाई; भ्रष्ट झाले सरकार.. म्हणून झाला महागाईचा हा हा कार , अशा घोषणा दिल्या.
राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ॠता आव्हाड म्हणाल्या की, इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थ पडली आहे. आपल्या देशातील महागाई कमी करण्याचे कोणतेही धोरण आखले जात नाही. आता महागाई कमी करण्यासाठी जनतेने काय करावे, हे तरी सरकारने सांगायला हवेय. आपल्या देशाने अमेरिकेच्या टेरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आपले नेतृत्व अमेरिकेला घाबरते की काय, हे माहित नाही. मात्र, हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्युपंथाला लागले आहेत. त्याचे कोणतेही सोयरसुतक या सरकारला नाही.
सुहास देसाई यांनी, सध्या पेट्रोल आणि डिझेलवर कंपन्यांकडून प्रति लिटर 15 रुपयांची बक्कळ कमाई होत आहे तर, सामान्यांच्या खिशातून राजरोस लूट केली जात आहे; सध्या कच्या तेलाच्या किंमती चार वर्षांच्या निचांकी पातळीवर आहे. तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे, अशी टीका केली. तर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी, हे सरकार आम्हा महिलांना बावळट समजत आहे. महिलांना पंधराशे रूपये देऊन मते विकत घेतली आहेत. हे सरकार “नोट फाॅर वोट” चे आहे. या सरकारने आजवर महागाईबद्दल कोणतेही धोरण आखलेले नाही. त्यामुळेच आम्ही हे आंदोलन जनतेचे प्रतिनिधी म्हणून करीत आहोत. आजचे आंदोलन प्रातिनिधिक आहे. यापुढे आमचे आंदोलन हे अधिक तीव्र असणार आहे, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अनेक आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.