Audi चा ब्रँड अँबॅसिडर होत Neeraj Chopra कडून 'ही' करोडो किमतीची कार खरेदी
भारतीय मार्केटमध्ये जरी बजेट फ्रेंडली कार्सना मोठी मागणी मिळत असली तरी लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच तर देशात लक्झरी कार उत्पादक कंपन्या सुद्धा पाहायला मिळतात. यातीलच एक विश्वासाची कंपनी म्हणजे Audi. नुकतेच भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा Audi India चा ब्रँड अँबॅसिडर झाला आहे. यासोबतच त्याने कस्टमाइज्ड Audi RS Q8 परफॉर्मन्स कार खरेदी केली आहे.
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक नवीन आणि अतिशय पॉवरफुल सुपर एसयूव्ही जोडली आहे. त्याने Audi RS Q8 Performance चे कस्टमाइज्ड व्हर्जन खरेदी केली आहे, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. अलीकडेच नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 90 मीटरपेक्षा जास्त भाला फेकला होता.
या लक्झरी कारची डिलिव्हरी मिळाल्यानंतर, नीरज चोप्राने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आणि लिहिले की, “इतर मुलांप्रमाणे, मलाही नेहमीच कारची आवड होती, पण असा क्षण प्रत्यक्षात येईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती.”
नीरज चोप्राची Audi RS Q8 Performance ही एक सामान्य एसयूव्ही नसून ती परफॉर्मन्स आणि लक्झरीचा उत्तम मिलाफ आहे. ही कार नीरजसाठी खास कस्टमाइझ करण्यात आली आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनली आहे. त्यात निळ्या लेसर हेडलाइट्स बसवण्यात आल्या आहेत, ज्या 600 मीटरपर्यंत व्हिसिबिलीटी देतात. ब्रेक कॅलिपर्सनाही निळा रंग देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचा लूक अधिक स्पोर्टी बनला आहे. इंटिरिअरमध्ये सीट्स आणि सीट बेल्टवर निळी शिलाई आहे.
ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स एसयूव्हीच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 4.0 लिटर ट्विन-टर्बो व्ही8 इंजिन आहे, जे 645 बीएचपी पॉवर आणि 850 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 3.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते आणि तिचा कमाल वेग ताशी 305 किलोमीटर आहे. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (Tiptronic) आणि ऑडीची प्रसिद्ध Quattro ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम देखील आहे.
या लक्झरी एसयूव्हीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, भारतात तिचे बेस मॉडेल 2.5 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, परंतु नीरज चोप्राच्या कस्टमाइज्ड व्हर्जनची किंमत सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंत जाते. यामध्ये विशेष कलर पॅकेजेस, इंटिरिअर कस्टमायझेशन आणि अॅडव्हान्स टेक्नॉलजी दिली गेली आहे. ही कार फक्त देशातील निवडक सेलिब्रिटींसाठी उपलब्ध आहे आणि आता नीरज चोप्रा देखील या प्रीमियम क्लबचा भाग बनला आहे.