
तुमच्या ग्रुप मध्येही कोणाचीतरी रॉयल एनफिल्ड बाईक असेलच. नसली तरी कोणालातर नाहीतर तुम्हालाही घ्यायची इच्छा असेलच. एवढ्या प्रसिद्ध असलेल्या या रॉयल एनफिल्ड ब्रँडचा नेमका इतिहास काय आहे? कशी ही बाईक कंपनी भारतात आणि जगात एवढी प्रसिद्धीस आली? जाणून घेऊयात.
रॉयल एनफिल्ड ही जगातील सर्वात जुन्या आणि सातत्याने प्रोडक्शनमध्ये असलेल्या मोटरसायकल ब्रँड्सपैकी एक आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रभाव वाढत असताना, एका छोट्या सायकल व्यवसायातून जगातील सर्वात जुन्या मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या या रॉयल एनफिल्डचा जन्म झाला. या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात जॉर्ज टाउनसेंड अँड कंपनी या सायकल आणि सुई बनवणाऱ्या व्यवसायापासून झाली. 1891 मध्ये अल्बर्ट एडी आणि बॉब वॉकर स्मिथ या दोन उद्योजकांनी हा व्यवसाय ताब्यात घेतला. त्यानंतर 1893 मध्ये कंपनीचे नाव ‘एनफिल्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ असे ठेवण्यात आले.
1894 मध्ये कंपनीच्या सायकलींना ‘रॉयल एनफिल्ड’ हे नाव मिळाले. पुढे 1901 मध्ये कंपनीने आपली पहिली मोटरसायकल तयार केली आणि एका खऱ्या अर्थाने बाईक जगतात नव्या युगाची सुरुवात झाली. जॉर्ज टाउनसेंड यांच्या मूळ व्यवसायाने कंपनीचा पाया घातला असला, तरी रॉयल एनफिल्ड ब्रँडची स्थापना अल्बर्ट एडी आणि बॉब वॉकर स्मिथ यांनी केली असे म्हणायला हवे.
रॉयल एनफिल्डचा ऐतिहासिक प्रवास
इंग्लंडमध्ये सुरु झालेल्या रॉयल एनफिल्डने 1932 मध्ये पहिल्यांदा बुलेट मॉडेल सादर केले. पुढे ती कंपनीची ओळख बनली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीने सैन्यासाठी मोटरसायकल आणि सायकली तयार केल्या. इंग्लंडमधील कंपनीने मद्रास मोटर्ससोबत पार्टनरशिप करून भारतात ‘एनफिल्ड इंडिया’ची सुरूवात केली. 1955 मध्ये मद्रास इथे कंपनीचा प्रोडक्शन प्लांट सुरू झाला. भारतीय सैन्यासाठी बुलेट मोटरसायकलींची मागणी वाढल्याने ब्रँडला भारतात चांगला मजबूत पाया मिळाला.
1990 मध्ये आयशर ग्रुपने एनफिल्ड इंडियामध्ये 26% हिस्सेदारी घेतली. 1993 मध्ये आयशरने 60% हिस्सेदारी मिळवून कंपनीवर नियंत्रण मिळवले. 1994 मध्ये एनफिल्ड इंडियाचे नाव बदलून ‘रॉयल एनफिल्ड मोटर्स’ करण्यात आले.
रॉयल एनफिल्डचे मालक आणि बोर्ड मेंबर्स कोण आहेत?
रॉयल एनफिल्ड ही आयशर मोटर्स लिमिटेडची कंपनी आहे. आयशर मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ लाल यांनी ब्रँडच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या बी. गोविंदराजन हे आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि रॉयल एनफिल्डचे CEO आहेत. आयशर मोटर्सच्या बोर्डमध्ये सिद्धार्थ लाल, विनोद अग्रवाल, बी. गोविंदराजन यांच्यासह स्वतंत्र संचालक इंदर मोहन सिंह, एस. माधवन, तेजप्रीत एस. चोप्रा, अरुण वासू आणि इरा गुप्ता यांचा समावेश आहे.
भारतातील लोकप्रियता आणि ग्लोबल नेटवर्क
बुलेट, क्लासिक 350, हंटर 350, इंटरसेप्टर 650 आणि हिमालयन या मॉडेल्समुळे रॉयल एनफिल्डला भारतात भरपूर लोकप्रियता मिळाली. कंपनीने रायडिंग कम्युनिटी, Motoverse आणि हिमालयन ओडिसी यांसारख्या उपक्रमांतून ब्रँडशी ग्राहकांचे आणि खास करून तरुण पिढीशी नाते मजबूत केले.
भारतामध्ये कंपनीची 2,000 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये जवळपास 850 स्टोअर्स आहेत. चेन्नईजवळील ओरगडम आणि वल्लम वडागल येथे प्रोडक्शन प्लांट्स असून, ब्रिटनमधील ब्रंटिंगथॉर्प आणि चेन्नई येथे टेक्निकल सेंटर्स आहेत. बांगलादेश, नेपाळ, ब्राझील, थायलंड, अर्जेंटिना आणि कोलंबिया येथे CKD असेंब्ली सुविधा आहेत.
कंपनीची विस्तार रणनीती
रॉयल एनफिल्डची रणनीती म्हणजे जुन्या डिझाइनचा वारसा कायम ठेवून आधुनिक टेक्नोलॉजी, नवीन इंजिन क्षमता आणि जागतिक मार्केटमध्ये विस्तार करणे. 350cc ते 750cc मोटरसायकल सेगमेंटवर लक्ष केंद्रित करून कंपनीने इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल GT 650 सारखी मॉडेल्स सादर केली. इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी फ्लाइंग फ्ली ब्रँडची सुरुवात हा कंपनीच्या भविष्यातील विस्ताराचा भाग आहे.
Ans: रॉयल एनफिल्ड ही आयशर मोटर्स लिमिटेडची कंपनी आहे. आयशर मोटर्स ही भारतीय शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी असून तिची मालकी भागधारकांकडे आहे.
Ans: रॉयल एनफिल्डचा मोटरसायकल ब्रँड 1901 मध्ये इंग्लंडमध्ये सुरू झाला. भारतातील मद्रास येथे 1955 मध्ये प्रोडक्शन प्लांट सुरू करण्यात आला.
Ans: बी. गोविंदराजन हे रॉयल एनफिल्डचे CEO आणि आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सिद्धार्थ लाल हे आयशर मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष आहेत