फोटो सौजन्य: iStock
टाटा मोटर्सच्या आरोग्य उपक्रमाने देशभरातील समुदाय आरोग्यसेवेत मोठा बदल घडवून आणला आहे. आरोग्यसेवा आणि पोषणाच्या माध्यमातून हा उपक्रम 6.6 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला असून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा घडवली आहे. विशेष म्हणजे कुपोषित मुलांमध्ये 87 टक्के बरे होण्याचे प्रमाण संपादित करण्यात आले आहे, तर महिलांमधील ॲनेमियाचे प्रमाण तब्बल 80 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. हा परिणाम लवकर पोषण हस्तक्षेप आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रमांची क्षमता अधोरेखित करतो.
या उपक्रमाचा त्रिस्तरीय दृष्टिकोन आहे: मुलांमधील कुपोषण कमी करणे, महिला आणि किशोरवयीनांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा देणे. आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान या उपक्रमाने 6.66 लाखांपर्यंत लाभार्थींच्या जीवनात सकारात्मक बदल केला. यातून टाटा मोटर्सची समुदायांमध्ये शाश्वत बदल घडवण्याची कटिबद्धता दिसून येते.
जमशेदपूर, पुणे, पंतनगर, धारवाड, लखनऊ, सानंद आणि मुंबई अशा ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण भाग आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये पोषण, आरोग्य जागरूकता आणि उपचार सेवा पोहोचवून आरोग्य स्थितीत मोठा फरक पडला आहे. जमशेदपूरमध्येच जवळपास 3 लाख समुदाय सदस्यांवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुंबईतील ट्रॉम्बे झोपडपट्टी भागात प्रकल्प ‘आरोग्यसंपन्न’ अंतर्गत गंभीर कुपोषणाचे प्रमाण तब्बल 90 टक्क्यांनी कमी झाले. सानंद येथे सुरू केलेल्या प्रकल्पांतर्गत 506 गंभीर कुपोषित मुलांना योग्य केअर मिळाली आणि 88 टक्के मुलांमध्ये बरे होण्याचे प्रमाण नोंदले गेले.
व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच
या प्रभावाबाबत टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, “आम्ही पोषणाकडे मानवी जीवनचक्रातील स्थैर्याचा आधारस्तंभ आणि प्रगतीचा सक्षमकर्ता म्हणून पाहतो. आमच्या आरोग्य उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही समुदाय-संचालित मॉडेल राबवले आहे, ज्यामुळे कुपोषण आणि मातांच्या आरोग्य समस्या कमी करण्यात मदत झाली आहे. हा उपक्रम आमच्या धोरणात्मक सीएसआर आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि सरकारी उपक्रम, सहयोगी व स्थानिक समुदायांसोबत मिळून आम्ही दीर्घकालीन आरोग्य परिणाम साध्य करत आहोत.”
सध्या टाटा मोटर्सची उपस्थिती 26 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. शाश्वत विकास ध्येयांशी संलग्न राहून कंपनी मुलांमधील कुपोषण कमी करत आहे, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करत आहे आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा वाढवत आहे.