
टोयोटा आणि किर्लोस्कर यांचा इतिहास
टोयोटा ग्रुपची स्थापना जपानमध्ये 1937 मध्ये किइचिरो टोयोडा यांच्याकडून करण्यात आली. सुरुवातीला ही कंपनी ऑटोमोबाईल नसून, हातमाग कंपनी म्हणून स्थापित झाली होती. पहिल्या महायुद्धानंतर जपानमध्ये वाढत्या वाहनांच्या मागणीला लक्षात घेऊन या कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला आणि ‘टोयोटा मोटर कार्पोरेशन’ची स्थापना करण्यात आली. पुढे जाऊन टोयोटाने ‘टोयोटा प्रोडक्शन सिस्टम’ (TPS) ही कमी दरात उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू आणि गाड्या तयार करण्याची प्रणाली विकसित केली. आज टोयोटा ही जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.
किर्लोस्कर समूहाची स्थापना लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी अगदी लहान वयापासून 1888 मध्ये केली. बेळगाव येथे एका सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून सुरु केलेला हा प्रयत्न, औंध संस्थानच्या राजांकडून मिळालेल्या मदतींमुळे ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या कंपनीपर्यंत आला. सांगली जिल्ह्यात कुंडल मध्ये सुरु झालेल्या या ‘किर्लोस्करवाडी’च्या कारखान्यात पहिल्यांदा फक्त शेतीला लागणाऱ्या लोखंडी वस्तू आणि डिझेल अशीच उत्पादने घेतली जात होती. शेतीव्यवसायामध्ये लागणाऱ्या यंत्रासाठी किर्लोस्कर यांनी मोठे यश मिळवले. पुढे जाऊन 90 च्या दशकात किर्लोस्कर यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला.
भविष्यात रस्ते सुरक्षासाठी काम करणाऱ्यांचे Toyota Kirloskar Motor कडून टीएसईपी द्वारे सशक्तीकरण
‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’ची स्थापना
1997 मध्ये जपानच्या या टोयोटा मोटर कार्पोरेशन आणि भारतातील किर्लोस्कर ग्रुप यांनी एकत्र येऊन भारतात ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड’ (TKM) या संयुक्त उपक्रमाची स्थापना केली. या संयुक्त उपक्रमामध्ये भारतातील किर्लोस्कर ग्रुप यांची 11% भागीदारी आहे, तर टोयोटा मोटर कार्पोरेशन यांची 89% भागीदारी आहे. बेंगळुरू, कर्नाटकमध्ये या कंपनीचे मुख्यालय स्थापण्यात आले. तर यांचा मुख्य कारखाना बिदादी कर्नाटक इथे आहे.
टोयोटा किर्लोस्कर यांची प्रमुख उत्पादने
टोयोटा किर्लोस्कर हे त्यांच्या आरामदायी मजबूत SUV आणि हायब्रीड गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. इनोवा क्रिस्टा आणि इनोवा हायक्रॉस हे त्यांची भारतातील सर्वात लोकप्रिय (MPV) मल्टीपर्पज वेईकल आहे. बरोबरच यांच्या देशातील सर्वात जास्त यशस्वी आणि प्रीमियम SUV फोर्चूनर आणि लेजेंडर या आहेत. अर्बन क्रुझर हायरायडर ही हायब्रीड तंत्रज्ञान असलेली SUV, आणि ग्लान्झा ,हायलक्स, लँड क्रूझर 300 असे इतर बरेच प्रसिद्ध मॉडेलया कंपनीने भारताला दिले आहेत.
Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनं विकली?
महाराष्ट्रातील गुंतवणूक
टोयोटा किर्लोस्करने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (बिडकीन) औद्योगिक क्षेत्रात एक प्रचंड नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. सुमारे 16,000 ते 21,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबरोबर, दरवर्षी 1 लाख वाहने तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे हजारो नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.