career in commerce stream know the options details here nrvb
युक्रेन आणि रशिया संघर्षातील कळीचा मुद्दा आहे, तेलाचे अर्थकारण. बाकी मुद्दे गैरलागू असल्याचे सर्व तज्ज्ञांचे सांगणे आहे. जागतिक पातळीवरील अशा संघर्षाच्या मुळाशी आधी अर्थकारण आणि नंतर अस्मिता-राष्ट्रप्रेम-धर्म वगैरे बाबी असतात, हे वारंवार सिध्द झाले आहे. आधी रोकडा व्यवहार, मग बाकी सारे काही, हेच खरे वास्तव. रोकडा व्यवहार करण्याचे तंत्र आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी व्यापार- उदिम-व्यवसाय या क्षेत्रातील ज्ञान हस्तगत करावे लागते. यासाठी वाणिज्य शाखेची निवड करावी लागते.
तथापि, मनाजोगत्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे, उत्तम करिअर घडेल, असे समजणेही चुकीचे आहे. व्यावहारिक गणितात गती असलेले, उत्तम संवाद आणि लेखन कौशल्य असलेले आणि तंत्रकौशल्य प्राप्त करुन त्याचा प्रभावी वापर करु शकणारे विद्यार्थी अधिक यशस्वी होतात. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना व्यापार, व्यवसाय, बाजारातील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्वे, सरकारची वित्तीय धोरणे, औद्योगिक धोरण, शेअर मार्केट आदी बाबींचे ज्ञान प्राप्त होते.
१२ वीनंतर इच्छूक उमेदवार बी.कॉम आणि त्यानंतर एम.कॉम करु शकतो. या दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा वित्त, व्यवसाय प्रशासन, लेखा, ई-कॉमर्स, विक्री, विपणन आदी विषयांचा अभ्यास होतो. १२ वीनंतर फायनान्स, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, इन्शुरन्स, फॉरेन ट्रेड, स्टॉक ब्रोकिंग ॲण्ड इव्हेन्स्टमेंट ॲनॅलिस्ट अशासारखे अभ्यासक्रम करता येतात. गेल्या काही वर्षात बॅचलर इन अकाउंटन्सी ॲण्ड फायनान्स, बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स, फायनांशियल मार्केट्स असे स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरु केले आहेत.
भारतीय अर्थव्यस्थेला चालना देणाऱ्या घटकांमध्ये बँक डिपॉझिट्स, म्युच्यूअल फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंच्यूर कॅपिटल, इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट यामध्ये सातत्याने नव्यानव्या बाबी घडत आहेत. त्याचाही फायदा वाणिज्य शाखेतील प्रशिक्षित उमेदवार घेऊ शकतात.
वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम व या विषयाशी संबंधित स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम केल्यास पुढील करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. (१)अकाउंटन्ट, (२)फायनान्स कन्ट्रोलर, (३)अकाउंटन्ट एक्झिक्युटिव्ह, (४)चार्टर्ड अकाउंटन्ट, (५)कंपनी सेक्रेटरी, (६)फायनान्स ॲनालिस्ट, (७)फायनान्स मॅनेजर, (८)फायनान्स कन्सल्टंट, (९)इनव्हेस्टमेंट ॲनॅलिस्ट, (१०)स्टॉक ब्रोकर, (११)पोर्टफोलिओ मॅनेजर, (१४)टॅक्स ऑडिटर, (१५) टॅक्स कन्सलटंट, (१६) ऑडिटर, (१७) स्टॅटिस्टियन, (१८) इकॉनॉमिस्ट, (१९) क्रेडिट मॅनेजर, (२०) ज्युनिअर अकाउंटंट, (२१)बूक कीपर, (२२)इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- ईकॉमर्स, (२३)कार्पोरेट लॉयर, (२४)अध्यापन, (२५)नागरी सेवा, (२६)विमा क्षेत्र, (२७)वित्तीय संस्था, (२८)कॉस्ट अकाउंटन्ट
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर वाणिज्य विषयाचा अभ्यासक्रम बहुतेक सर्वच विद्यापीठांमध्ये करता येतो. तथापि गेल्या काही वर्षात देशात आणि महाराष्ट्रात काही संस्थांनी वाणिज्य शाखेत दर्जेदार शिक्षण देण्यात दबदबा निर्माण केला आहे. अशा संस्थेत पदवी अभ्यासक्रमाला मिळालेला प्रवेश हा पुढील उत्तम करिअरचा मार्ग सुकर करत असतो.
एका सर्वेक्षणानुसार २०२१ मध्ये देशस्तरावरील पुढील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी ओढा दिसून आला. (१)श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स नवी दिल्ली (सरासरी पॅकेज- ९ लाख २५ हजार रुपये.), (२) लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स फॉर वुमेन्स, नवी दिल्ली (सरासरी पॅकेज- ८ लाख ४० हजार रुपये.) (३) हिंदू कॉलेज, नवी दिल्ली (सरासरी पॅकेज- ६ लाख ५० हजार रुपये.) (४) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, ख्रिस्त डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी बेंगळुरु, (सरासरी पॅकेज- ६ लाख ४० हजार रुपये.), (५)नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, मुंबई (सरासरी पॅकेज- ६ लाख रुपये.), (६) देशबंधू कॉलेज, नवी दिल्ली (सरासरी पॅकेज- ५ लाख ९० हजार रुपये.), (७) हंसराज कॉलेज, नवी दिल्ली (सरासरी पॅकेज- ५ लाख ४० हजार रुपये.) (८) स्कूल ऑफ कॉमर्स, जैन डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी बेंगळुरु, (सरासरी पॅकेज- ५ लाख ४० हजार रुपये.), (९) ख्रिस्तु जयंती कॉलेज बेंगळुरु, (सरासरी पॅकेज- ५ लाख २५ हजार रुपये.) (५) मिठीबाई कॉलेज, मुंबई (सरासरी पॅकेज- ५ लाख रुपये.)
गेल्या काही वर्षात साधारणत: अशीच स्थिती दिसून येते. त्यामुळे बरेच विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करतात. या महाविद्यालयांमध्ये सक्रिय असे प्लेसमेंट सेल उघडण्यात आले आहे.
(१) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉलेज पुणे, (२) के. सी. कॉलेज मुंबई, (३) के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स मुंबई, (४) सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्स पुणे, (५) एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई, (६) एलफिन्स्टन कॉलेज मुंबई, (७) आर.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स मुंबई, (८) हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई, (९) बी.एम कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, (१०) नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, (११) सर परशुरामभाऊ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स, पुणे, (१२) लोयोला कॉलेज ऑफ कॉमर्स चेन्नई, (१४) स्टेला मॅरिस कॉलेज चेन्नई, (१५) सेंट जोसेफ कॉलेज बेंगळुरु, (१६) प्रेसिडेन्सी कॉलेज चेन्नई पुणे, (१७) स्कूल ऑफ कॉमर्स एमआयटी पुणे
चार्टर्ड अकाउंटंट- हे तज्ज्ञ कंपनीचे लेखापरीक्षण, करनिर्धारण आदी बाबींवर लक्ष ठेवतात. कोणत्याही कंपनीमध्ये या तज्ज्ञांना महत्वाचे स्थान प्राप्त होते. कंपनीच्या वित्तीय बाबींची काळजी आणि संनियंत्रण करण्याचे कार्य या तज्ज्ञांना करावे लागते.
आर्थिक उलाढाली सातत्याने वाढत असल्याने या तज्ज्ञांची गरजही वाढत चालली आहे. विदेशातील कंपन्याही या तज्ज्ञांच्या सेवा घेत असतात. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था या विषयाशी निगडित अभ्यासक्रम चालवित असते. १२ वी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. संपर्क-www.icai.org
कॉस्ट ॲण्ड वर्क अकाउंटंट- (सीडब्ल्यूए)- कंपनीच्या विविध प्रकारच्या मूल्यांकनासंदर्भात या तज्ज्ञांना कार्य करावे लागते. या अनुषंगाने कंपनीचे लेखापरीक्षण, आयात-निर्यात कागदपत्रांचे प्रमाणिकरण, प्रशासन, मूल्यनिर्धारण आदी कामेही या तज्ज्ञास करावी लागतात. संस्था आणि कंपनीच्या विविधांगी आर्थिक घडामोडींवर देखरेख ठेऊन धोरणात्मक व्यूहनितीबाबत सल्ले आणि निर्णय या तज्ज्ञांकडून अपेक्षित असतात.
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्क अकाउंटंट ऑफ इंडिया या क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवते. तो फाउंडेशन, इंटरमीजिएट आणि फायनल असा तीन स्तरीय आहे. फाउंडेशन अभ्यासक्रम १२वी उत्तीर्ण विद्यार्थी करु शकतात. इंटरमिजिएट अभ्यासक्रमास कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर थेट अर्ज करु शकतात. संपर्क-www.icwai.org
चार्टर्ड फायनान्शिअल ॲनॅलिस्ट- पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स ॲण्ड रिसर्च या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी संबंधित उमेदवार आपले कौशल्य वापरु शकतात. माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत केले असल्यास संधी आणखी वाढू शकते. चार्टर्ड फायनान्शिअल ॲनॅलिस्ट होण्यासाठी आयसीएफएआय (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शिअल ॲनालिसिल ऑफ इंडिया) या संस्थेचा तीन स्तरीय अभ्यासक्रम करावा लागतो. हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गात आणि ऑनलाइन पध्दतीनेही करता येतो. संकेतस्थळ-www.icfai.org
सुरेश वांदिले
ekank@hotmail.com