
ज्या दिवशी तुम्ही हसणार नाही, तो तुमचा दिवस हा वाया गेला असं समजा…’ हे उद्गार आहेत चार्ली चॅप्लिन या भन्नाट विनोदवीराचे! याची आठवण आज एका नाटकाच्या आणि त्यातील व्यक्तिरेखांच्या निमित्ताने आलीय.
नाटक ‘सही रे सही’. जे गेली २० वर्षे रंगभूमीवर हाऊसफुल्ल गर्दी खेचतेय. येत्या १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी विसावे वर्ष पूर्ण करून एकविसाव्या वर्षात पदार्पण करतेय. आणि त्यातला एकमेव ‘स्टार’ भरत जाधव हा आजही रसिकांची पहिल्या प्रयोगायेवढाच किंबहुना त्याही अधिक प्रमाणात हसवणूक करतोय. प्रयोगाचा दिवस, आणि वेळ हा वाया जाणार नाही याचे जणू ग्रीन कार्डच या नाटकाला रसिकदरबारी मिळालंय. अमाप ऐतिहासिक या यशासाठी असणारी मोर्चेबांधणी ही थक्क करून सोडणारी.
भरत जाधव हा कॉमेडीकिंग गेली चक्क २१ वर्षे ‘सही रे सही’ करतोय. एक पिढी बदलली. नाट्यगृहेही नवीन झाली. प्रेक्षकांची अभिरुचीही बदलली. नवे रंगकर्मी आले. जुने बाद ठरले. त्यावेळीच आलेल्या बहुतेक सर्व नाटकांनी पडदा पाडला. पण अपवाद ठरला तो भरत आणि त्याचं सही रे सही!
आधी लता नार्वेकर यांची ‘श्रीचिंतामणी’ आणि नंतर सुधीर भटांची ‘सुयोग’ आणि आता भरत जाधवचीच ‘एण्टरटेन्मेंट…’
संस्था बदलल्या पण ‘सही रे सही’तल्या चौरंगी भूमिकेत भरत जणू व जसा एकरूप झालाय. रसिकांनीही गेली २० वर्षे या नटावर अन् नाटकावर भरभरून प्रेम केलं. रसिकांचं असं प्रेम यापूर्वी संगीत नाटकांच्या जमान्यात बालगंधर्वांवर आणि नंतर प्रभाकर पणशीकर यांना मिळाले होते. याची नोंद केवळ मराठी रंगभूमीवरच नव्हे तर जागतिक रंगभूमीवरही निश्चितच होईल. यात शंकाच नाही.
भरतबद्दल लिहिण्यासारखं बरंच काही आहे. कारण अगदी एकांकिकांपासून ती आजवर झालेली रंगवाटचाल बघण्याचा योग जुळून आलाय. काहीतरी आगळेवेगळे आणि आव्हानात्मक करण्याचा त्याचा स्वभावच आहे. मध्यंतरी ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत तो चक्क विठोबा झाला! सोबत होती स्मिता शेवाळे! एक विनोदवीर. जो आघाडीचा आहे.
तो अशा प्रकारे पौराणिक – धार्मिक चौकट असलेल्या विठोबाच्या भूमिकेत पेश करणे म्हणजे आव्हानच होते. पण त्याचा स्वभाव, त्यातली असलेली निरागसता, वर्तनातला सज्जनपणा यामुळे तो विठोबाही फिट दिसला. महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या विठोबाच्या भूमिकेत त्याला भक्तांनी, रसिकांनी मान्य केलं. सोमवार ते शनिवार साडेसात वाजता विठोबाच्या दर्शनासाठी श्रद्धाळू भाविक गर्दी करू लागले होते. याचे अनेक किस्से हे सांगितले जातात. असो.
दुसरं आव्हान म्हणजे ‘वेलकम जिंदगी’चं. तरुण, विनोदी अभिनेता म्हणून आजही आपला फॉर्म टिकवून असलेल्या भरतनं १०२ वर्षाच्या वृद्धपापाच्या ७५ वर्षांच्या मुलाची भूमिका केली होती. हे नाटक विनोदी नाही तर गंभीर आहे. अस्वस्थ करून सोडणारी वयोवृद्धाची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यात विजयही मिळविला.
विजय असा की या नाटकाच्या भूमिकेसाठी त्याला २०१८ चा ‘मटासन्मान’ हा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणूनही मिळाला. हजारो हशें वसूल करणाऱ्या या विनोदवीराने या नाटकात रसिकांना चक्क रडवलं आहे. एक हटके आव्हानात्मक गंभीर भूमिका त्याच्या कारकिर्दीत आकाराला आली. एक सर्वस्पर्शी, बहुरंगी कलाकार म्हणून असलेली ऊर्जा आजही त्यात दिसून येते. त्याला कल्पकता व परिपक्वतेची जोड मिळालीय.
व्यावसायिक रंगभूमीवरल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल तो म्हणतो, ‘एक वेगळ्या प्रकारचे नाटक. एक अभिनेता म्हणून चॅलेंज होते आणि मी ती भूमिका प्रामाणिकपणे केलीय. रसिकांनीही त्यावर मान्यतेचा ठसा उमटवलाय!’
केवळ एक ‘अभिनेता’ म्हणून भरत ‘सर्वोत्कृष्ट’ आहे इतपतच नाही. तर एक माणूस, माणुसकी म्हणूनही नंबर वन आहे. ‘सही रे सही’चे दौरे जोरात होते. बहुदा जून-जुलै महिना आणि २०१०-११ हे वर्ष. या दोन महिन्यात ‘सही’चा एकही प्रयोग करता येणं शक्य नव्हते. कारण भरतकडे दोन पिक्चर आलेले आणि बँकॉकचा दौराही होता, त्यामुळे ठरलेले काही प्रयोग हे रद्द करावे लागले. दोन महिने सारे सहकलाकार व बॅकस्टेजवाले ‘बेकार’ ठरणार. चांगलाच आर्थिक फटका साऱ्यांना बसणे, हे स्वाभाविकच होते, पण भरतने हे ओळखले. मानधनाची भरगच्च पाकीटे भरली आणि निर्माते सुधीर भट यांच्याकडे सोपावली.
ही ‘भरतभेट’ कुणालाही करता कामा नये म्हणूनही त्याने सांगितले. पण त्यामागे भरतच आहे हे सुधीर भटांनी नंतर सांगितले. सहकलाकारांची पुरेपूर काळजी घेणारा रंगकर्मी त्यातून नजरेत भरला. ही त्याची माणुसकी!
भरत मूळचा कोल्हापूरचा. त्याचे बाबा हे टॅक्सीचालक होते. रात्री ‘महाराष्ट्राची लोकधारा’चा प्रयोग आणि सकाळी टॅक्सी धुण्याची जबाबदारी ही भरतकडे असायची. हा भूतकाळ मराठीतला एक सुपरस्टार असूनही माझ्याशी एका मुलाखतीत त्याने जागा केला होता. मध्यमवर्गीय घरांमध्ये नाट्यक्षेत्रात जाण्याबद्दल तेवढीशी उत्सुकता दिसत नाही. पण भरत एक आदर्श उदाहरण आहे.
भरतच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. ‘सही रे सही’ नाटकाच्या पहिल्याच वर्षात ३६५ दिवसात ५६७ प्रयोग हे हाउसफुल्ल झालेत! बॉलिवूडच्या ‘स्टार’ मंडळींच्या दारी असणारी ‘व्हॅनिटी व्हॅन’ वापरणारा भरत हा पहिला मराठी अभिनेता! परळच्या चाळीतून टॉवरच्या आलिशान ब्लॉकमध्ये नाटकांमुळे पोहचलेला रंगकर्मी! नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात बिझी राहून यश, कीर्ती, पुरस्कार मिळविणारा अभिनेता! स्वतःच्या नावाचं प्रॉडक्शन हाऊस स्थापन करून नाट्यनिर्मिती करणारा कल्पक रंगधर्मी!
‘सही रे सही’त भरतच्या चार भूमिका आहेत. मदन सुखात्मे, रंगा, हरी आणि गलगले! त्यातली गलगले ही भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली ती आजही कायम आहे. ‘गलगले’ थेट चित्रपटापर्यंतही पोहचला. एवढी जादू त्या भूमिकेत खच्चून भरलीय. या ‘गलगले’च्या भूमिकेची जन्मकथा नाट्यपूर्ण आहे. पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यमंदिराबाहेर १९९४ साली भरत उभा होता. तेव्हा रस्ता ओलांडताना एक व्यक्ती हा स्वतःशीच बोलत होता. स्वतःला सूचना देत होता. ‘चला चालूया. डावीकडे बघा.
उजवीकडे बघा. चला आता रस्ता आपण ओलांडूया.’ असं तो बोलत होता. हा प्रसंग नेमका भरतमधल्या रंगकर्मीने टिपला. अशा ‘पात्रा’चा वापर हा कुठेतरी निश्चितच करायचा, हे त्यांने पक्क ठरवलं पण काही केल्या योग जूळत नव्हता. ‘सही रे सही’त गलगले आला. नुसता आला नाही तर तो ‘छा’ गया. पुढे केदार शिंदे या भरतच्या जानीदोस्ताने त्यावरून पिक्चरही काढला. ‘सही रे सही’चे ‘ते’ आजही आकर्षण आहे. ‘विसावं वरीस’ असलं तरी मोक्याचच आहे!
गद्य नाटकाच्या वाटचालीत आचार्य अत्रे यांचे ‘तो मी नव्हेच!’ आणि गंगाराम गवाणकर यांचे ‘वस्त्रहरण’ ही दोन नाटके आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळे पाच हजार प्रयोगांनी विश्वविक्रमी ठरली आहेत. प्रभाकर पणशीकर आणि मच्छिंद्र कांबळी या नटश्रेष्ठांच्या नावावर ती ‘हाउसफुल्ल’ची मानकरी ठरली. तो विक्रमी वारसा पुढे दमदारपणे भरत जाधव ‘सही रे सही’तून चालवित आहे.
१५ ऑगस्ट हा दिवस जसा भारताच्या इतिहासातील एक राष्ट्रीय उत्सव ठरलाय. या दिवशी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होतो. लाल किल्ल्यावर पवित्र राष्ट्रध्वज फडकवला जातो. त्याचप्रमाणे नाट्यसृष्टीतला नाटकांच्या इतिहासातील १५ ऑगस्ट हा ‘सही रे सही’चा वाढदिवस. ज्याने मराठी रंगभूमीवर आलेली मरगळ वीस वर्षांपूर्वी दूर केली आणि आजही वयाच्या एकविसाव्या वाढदिवशी ‘हाऊसफुल्ल’ मनोरंजनाची पताका दिमाखात फडकवित आहे. मराठमोळा जणू उत्सवच हे नाट्य ठरलय…
-येत्या वाढदिवसानिमित्त
एकविसावं वरीस मोक्याचं
पुन्हा पुन्हा ‘सही’ पाहण्याचं!!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com