
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mohini Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत प्रेक्षकांना तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचा थरार पाहायला मिळणार आहे. या सीक्वेन्ससाठी कलाकारांनी पडद्यामागेही विशेष मेहनत घेतली. अभिनेता समीर परांजपे आणि अभिनेत्री अनघा ठाकूर यांनी या शूटिंगदरम्यान आलेली आव्हानं, घेतलेलं प्रशिक्षण आणि शंतनू दादाची मिळालेली मदत याबद्दल अनुभव शेअर केला.
या अॅक्शन सीक्वेन्सचं शूटिंग सलग तीन दिवस चाललं. त्याआधी फाइट मास्टर माने यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच तास बेसिक रिहर्सल करण्यात आली. लाकडी तलवारी, ढाली, लाठीकाठी आणि दांडपट्टा यांसारखी ऐतिहासिक शस्त्रं हाताळण्याचा अनुभव कलाकारांसाठी वेगळा होता.
अनघा ठाकूरने सांगितलं की, क्लासिकल डान्सचा अनुभव असल्यामुळे स्टेप्सचं कोऑर्डिनेशन आणि तलवार चालवतानाचा पवित्रा समजून घेणं तुलनेने सोपं गेलं. मात्र, मुंबईतील ऑक्टोबरचा उकाडा, जड पोशाख आणि आऊटडोअर शूटिंग यामुळे हा सीक्वेन्स आव्हानात्मक ठरला. शस्त्रं हाताळताना योग्य हालचाली करणं आणि थकवा असूनही प्रत्येक स्टेप अचूक करणं आवश्यक होतं.
शंतनू दादाच्या मार्गदर्शनाचा झाला फायदा
या सीक्वेन्सच्या तयारीदरम्यान शंतनू दादाच्या अनुभवाची आणि ऊर्जेची मोठी मदत झाल्याचं समीर परांजपेने सांगितलं. पारंपरिक शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेताना हात-पायांच्या हालचालींमध्ये अचूक समन्वय साधणं हे मोठं आव्हान होतं. शंतनू दादाच्या अनुभवामुळे या प्रक्रियेत मदत मिळाली, असं समीरने नमूद केलं.
अनघा ठाकूरनेही शंतनू दादाच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं. त्यांच्या प्रत्येक मूव्हमधून बॉडी लँग्वेज आणि अॅटिट्यूडचं महत्त्व शिकायला मिळाल्याचं तिने सांगितलं. फाइट मास्टर माने यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक शस्त्रांची ठेवण आणि हल्ल्याचे अँगल शिकणं हा तिच्यासाठी रंजक अनुभव ठरला.
पारंपरिक युद्धकलेविषयी वाढला आदर
समीर परांजपेच्या मते, ऐतिहासिक चित्रपटासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं हा खडतर पण अविस्मरणीय अनुभव होता. आधुनिक शस्त्रांच्या तुलनेत ऐतिहासिक शस्त्रं हाताळताना वेगळ्या कौशल्यांची गरज भासते. या प्रशिक्षणामुळे पारंपरिक युद्धकलेचा वारसा जपणाऱ्या कलाकारांविषयीचा आदर अधिक वाढल्याचंही त्याने सांगितलं.
मालिकेत RK म्हणजेच समीर परांजपे याला डेंग्यू झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे. मात्र, आगामी ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगची जबाबदारी आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याच्यासमोर आहे. अशा परिस्थितीत मोहिनी त्याची काळजी घेण्यासाठी पुढे येते. महेंद्र मोहिनीच्या मदतीने RK ला तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे धडे देतो.
या भावनिक कथानकासोबतच तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रसंग मालिकेत नवा थरार निर्माण करणार आहेत. कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि ऐतिहासिक युद्धकलेची झलक पाहणं प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.