माणसाच्या जीवात जीव असेपर्यंत खाणं हे लागतेच. तसेच हाडाच्या कलाकारालाही जीवात जीव असेपर्यंत नाटक हे लागतेच. त्याशिवाय तो जगू शकत नाही. त्याचं अस्तित्व म्हणजे नाटकच!
पण वयाच्या ऐन बहरात चक्क ३१ व्या वर्षी या एका संगीतसूर्याची अचानक एक्झिट झाली आणि जीव असेपर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त नाटकच केलय. त्यांचे अस्तित्व, ओळख म्हणजे नाटकच ठरले. आज त्यांच्या १३३ व्या वाढदिवशी याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. त्यांच्या आठवणींनी सारे भारावून गेले.
गेल्या ९ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात या संगीतसूर्याच्या भूतकाळाला उजाळा मिळाला. निमित्त होतं तिथल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नामांकन एका सोहळ्यात करण्यात आले. त्यासाठी त्यांचे वारसदार अशोक पाटील यांनी गेली सात-आठ वर्षे पाठपुरावा केला. आज केशवरावांची सहावी पिढी आपल्या इतिहास पुरुषाच्या भव्यदिव्य कामगिरीबद्दल धन्य होतांना दिसतेय. सोबतच ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक असलेले डॉ. सतीश पावडे यांची संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्यावरल्या चरित्रात्मक पुस्तकाची मराठीप्रमाणे इंग्रजीतही आवृत्ती प्रसिद्ध झालीय. त्यामुळे एका नटसम्राटाचा इतिहास मराठीसोबत अमराठी वाचकांपर्यंत पोहचणार आहे. जो प्रेरणादायी ठरेल.
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी म्हणजे, १जानेवारी १९०८ हा दिवस. या दिवशी केशवराव भोसले या तरुणाने ‘ललितकलादर्श’ नावाची नाटककंपनी हुबळी येथे स्थापन केली. संगीत नाटकांची परंपरा जपणारी ही संस्था आजही कार्यरत आहे. आपल्या स्थापनेचा शताब्दी सोहळा साजरा करणारी ही मराठी रंगभूमीवरली एकमेव नाट्यसंस्था आहे. हा ही एक विक्रमच म्हणावा लागेल. १ जानेवारी २००७ ते १ जानेवारी २००८ या वर्षात संस्थेने शताब्दी सोहळा आयोजित करून त्यावेळी संगीत नाटकांचा भूतकाळ जिवंत केला होता. त्यात सहभागी होण्याचे भाग्यही लाभले होते. केशवरावानंतर बापूराव पेंढारकर आणि त्यानंतर भालचंद्र पेंढारकर यांनी ही धुरा सांभाळली. नाट्यसंस्थेच्या स्थापनेचा किंवा मुहूर्ताचा नारळ फुटला की नाट्यसंस्था ही फुटते! – याचा अनुभव यापूर्वी नाट्यसृष्टीने घेतला आहे. पण ‘ललितकलादर्श’ मात्र एकमेव अपवाद म्हणावी लागेल. जी अनेक संकटांशी सामना करून पिढ्यान् पिढ्या ताकदीने रंगसेवा करतेय. रसिकांचे रंजन करतेय. हा रंगवसा चालवतेय.
केशवरावांनी निर्माते, कलाकार म्हणून ४ जानेवारी १९०८ या दिवशी ‘संगीत सौभद्र’ या नाटकाचा शुभारंभी प्रयोग हा हुबळी येथील गणेशपेठ मुक्कामी केल्याची नोंद आहे. त्यानंतर नाट्यसंस्थेची नाटकांसह घोडदौड सुरूच राहिली. दर्जेदार संगीत नाटकांचा प्रवाह त्यामुळे सुरू राहिला. या प्रवासात अनेक संकल्पना ही नव्यानेच रंगभूमीवर आकाराला आल्या. त्यामागे केशवरावांची कल्पकता दिसून येते.
३ फेब्रुवारी हा दिवस. कोल्हापूर येथे पॅलेस एरीनामध्ये संगीत ‘मृच्छकटिका’चा प्रयोग हा खुल्या रंगमंचावर सादर झाला. हा प्रयोग म्हणजे, हिंदुस्थानातील खुल्या नाट्यगृहातला पहिला भव्य प्रयोग ठरला. त्यापूर्वी असा प्रयोग झालेला नाही. या प्रयोगाह २५ हजार पुरुष रसिक आणि पाचहजारावर महिला रसिकांची उपस्थिती होती. नाटकांच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती असा हा प्रयोग रंगला. खुल्या नाट्यगृहात संगीत नाटकाचा प्रयोग करणं तसं आव्हानच. पण केशवरामाने त्यातही बाजी मारली.
‘ललिताकलादर्श’च्या स्थापनेपूर्वीचा एक प्रसंग. जो त्यांना रसिकांकडून ‘संगीतसूर्य’ हा किताब देऊन गेला. जो तसा नाट्यपूर्ण आहे. तो काळ संगीत रंगभूमीचा. गद्य नाटके ही जवळजवळ नव्हती. बालगंधर्व यांचा जमाना. ते संगीत रंगभूमीवरले ‘एकमेव’ समजले जात होते. व्यावसायिक नाटकात पहिलं पदार्पण आणि त्याच प्रयोगांनी महाविक्रम घडला. ब्रिटिशांचे राज्य. केशवरावांची घरची गरीबी. वडिलांचे निधन झालेले. त्यावेळी निर्माते जनूभाऊ निमकर यांची स्वदेश हितचिंतक नाटक कंपनी ही ‘संगीत शारदा’चे प्रयोग करायची. रात्रीचा प्रयोग जाहीर झालेला पण ऐनवेळी ‘शारदा’ची भूमिका करणारे कृष्णा देवळी हे आजारी पडलेले. निर्माते चिंताग्रस्त. अखेर त्यांनी केशवरावांना गाठले. दिवसभर संवाद आणि गाण्यांची तालीम करून घेतली आणि त्या वेळेचा बाल ‘केश्या’ हा शारदा म्हणून उभा राहिला. कोवळ्या वयातली शारदा! प्रयोगाला रसिक म्हणून साक्षात राजश्री शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हजर होते. ‘मूर्तिमंत भीती उभी राहिली’ हे गाणं रसिकांना आवडले. एवढं आवडलं की त्याला चक्क नऊ वेळा वन्समोअर मिळाला. हे गाणं संपू नये असंच वाटलं असेल. पण निर्माते जनूभाऊ निमकर हे स्टेजवर आले. त्यांनी हा पोरगा नवीन आहे. थकला आहे तरी वन्समोअरची कृपया मागणी करू नये, अशी विनंती केली. पण तरीही रसिकांची मागणी कायम होती. अखेर शाहू महाराजांनी मध्यस्थी केली. शेवटचा म्हणजे दहावा वन्समोअर घेऊन नाटक पुढे नेले. एखाद्या नाटकाच्या रिप्लेसमेंटमध्ये ९ वेळा वन्समोअर घेण्याचा हा विक्रम ठरला. स्वर्गीय स्वर आणि अप्रतिम अभिनय याने हा वयाने छोटा असणारा ‘केश्या’ त्यामुळे संगीतसूर्य बनला! हा ही चमत्कारच! पुढे ते नाट्यसृष्टीचे ‘कॅप्टन ऑफ शिप’ ठरले.
मराठी माणसांची एखादी संस्था चालविणे हे त्याकाळीही कठीण होते. वादविवाद, हक्क, मागण्या, कोर्टकचेऱ्या यामुळे अनेक नाट्यसंस्था फुटल्या आहेत. पण अशावेळी नव्याने झेप घेण्याचे आगळेवेगळे प्रयत्न या संगीतसूर्याने केले. १९१४ साली कंपनीतले वाद वाढले. प्रत्येक जण संस्थेचा हक्कदार म्हणून स्वतःला समजू लागला. शेवटी एकदम पंचवीस जणांनी ‘ललिताकलादर्श’ला रामराम ठोकला. पुन्हा नाटकात काम करणार नाही असे जाहीर केले. केशवराव भोसले तसे एकाकी पडले. ही विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने सुरळीत करण्यासाठी त्यांनी बालनाट्याचा आधार घेतला. त्यामुळे सारी नाट्यसृष्टी चक्रावून गेली. पारोळा मुक्कामी त्यांनी त्यावर निर्णय घेतला. बालसौभद्र, बालमृत्छकटिक यासह अनेक नाटके रंगभूमीवर आणली. बालरंगभूमीसाठी त्यांनी एक वेगळे दालन खुले करून दिले आणि रसिकांचाही प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. पालक आणि त्यांची मुलंबाळं यांची गर्दी अशा प्रयत्नांनी वाढली. एक मरगळ त्यामुळे दूर झाली. जी मंडळी त्यांना सोडून गेली त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनाच खेद वाटू लागला. केशवरांकडे दूरदृष्टी होती. चांगल्या नाटकांचे प्रयोग करणं, हे त्यांचे ध्येय होते.
नाटकाचा प्रयोग हा जाहीर केलेल्या वेळेत कधीही त्यावेळी सुरू होत नव्हता. तासोन् तास रसिकराजा हा पडदा कधी उघडला जाईल, याची वाट बघत बसायचा. ही बाब केशवरावांना खटकत होती. अखेर त्यांनी वेळेवर नाटकाचा पडदा उघडला जाईल जाणारच असा निर्णय घेतला. त्याचा एक उल्लेख ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगतात केला आहेच. ‘वक्तशीरपणा आमच्या अंगात अगदी नाटकाइतकाच मी भिनलेला आहे. आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा नऊ वाजता व्हायची, म्हणजे बरोबर नऊ वाजता. एकवीस वर्षे कंपनीच्या नाटकांचा पडदा वर गेला तो बरोबर आठ वाजून साठ मिनिटांनीच. एकसाष्टावं मिनिट त्या पडद्यांवर जातांना कधी घड्याळात बघितलं नाही!’ याला केशवरावांचा संदर्भ आहे. ललितकलादर्श या नाटक कंपनीचा प्रयोग हा जाहीर केलेल्या वेळेतच सुरू होणार. त्यासाठी संस्थानिक हे देखिल अपवाद नाहीत!’ असेही त्यांनी जाहीर केले. हे धाडस त्याकाळी देणगीदारांना हादरून सोडणारे ठरले!
एकदा बेळगावातले रसिक आश्चर्यचकीत झाले. उलट-सुलट चर्चा रंगल्या. कारण एक जाहीरात झळकली. आणि साऱ्यांचे लक्ष त्यामुळे पुन्हा एकदा केशवरावांकडे ओढले गेले. त्यात म्हटले होते –
‘मुक्काम फक्त मे महिना अखेर!
रा. रा. केशवराव भोसले हे नाटकाच्या धंद्यातून लवकरच रिटायर्ड होणार असल्याने बेळगांव येथील रंगभूमीवरील ही शेवटची झेप! ललितकलादर्श संगीत नाटक मंडळीतर्फे बेळगांव – शिवानंद थिएटरांत दोन प्रयोग-
शनिवार ता. ८/०५/१९२० रात्रौ ९ वाजता व
रविवार ता. ९/०५/१९२० रोजी दिवसा
‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा प्रयोग करणार!
-व्यवस्थापक’
-ही ती जाहिरात. आणि दोन्ही प्रयोग हाउसफुल्ल झाले! आज शंभरवर्षे उलटली. ‘शेवटचे काही प्रयोग’ म्हणून जाहिराती आज दिसतात आणि नंतर नाटकाच्या प्रयोगांची संख्या शंभरी पारही करते! असो. तर जाहिरातीपासून ते प्रयोगाच्या वेळेपर्यंत, ते सदैव जागरुक असायचे. ‘पडद्याला टाळी’ ही त्यांच्या नाटकांना हमखास मिळायची. देखणे पडदे हे आकर्षण ठरायचे.
८ जुलै १९२१ या दिवशी संयुक्त मानापमानाचा प्रयोग हाही त्यांच्या नाट्य कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. संगीतसूर्य आणि बालगंधर्व दोघेही या निमित्ताने एकत्र आले. आणखीन एका नाटकात हे दोघे एकत्र आले ते नाटक होतं – संगीत सौभद्र! बालगंधर्वांची भामिनी, सुभद्रा आणि केशवरावांची धैर्यधर, अर्जून – या भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. संगीत आणि अभिनयाच्या जुगलबंदीचे दर्शन त्यातून झाले. टिळक स्वराज्य फंडासाठी या दोन्ही नाटकांनी चांगली देणगी त्यातून दिली. देव – देश धर्मासाठी हे दोघे ग्लॅमरस गायक नट रंगमंचावर अवतरले. ज्यांनी त्यांचे प्रयोग अनुभवले ते रसिक धन्य झाले. सुरांची अक्षरशः मैफलच रंगली असणार, हे निश्चित.
एकेका संकटांचा मुकाबला त्यांनी धैर्याने केला. त्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या काळाच्या दिग्गज नाटककारांनी केशवरावांना नवीन नाटके सादर करण्यास नकार दिला. चांगल्या संहिता मिळू दिल्या नाहीत. अशावेळी निराश न होता केशवरावांनी नव्या नाटककारांचा शोध घेतला. रामचंद्र आत्माराम दोंदे यांचे ‘संगीत मदालसा’ आणि हिराबाई पेडणेकर यांचे ‘संगीत दामिनी’ ही दोन नाटके ताब्यात घेतली. तालमी सुरू केल्या आणि नाशिक येथे या दोन्ही नाटकांचे दिमाखात प्रयोग केले. कोल्हापूरचे आनंदराव मेस्त्री आणि बाबुराव पेंटर यांचे नेपथ्य व पडदे त्यात होते. नाटकांना त्यामुळे देखणेपण आले. वातावरण निर्मिती सुरेख झाली. याच्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. ज्या नव्या नेपथ्यकारांना मार्गदर्शक ठरतील.
‘ललितकलादर्श’ संस्थेचे वामन गोपाळ जोशी यांचे ‘राक्षसी महत्वकांक्षा’ हे नाटक. एका वेगळ्याच वैशिष्ट्यामुळे त्याकाळी चर्चेत राहिले. २० सप्टेंबर १९१३ या दिवशी या नाटकाचा शुभारंभी प्रयोग. मुंबईचा बॉम्बे थिएटर बुक करण्यात आला. याच प्रयोगाच्यावेळी रंगमंचावर मखमली पडदा चढला! नाट्यगृहाचा पडदा मखमली हा प्रथमच अवतीर्ण झाला. त्यानंतर नाट्यगृहाचे पडदे सर्वांनीच मखमली केले!
संगीत नाटकात कृष्ण, राम, अर्जुन, नारद यासह अनेक नट हे सर्रास गाणी गातात. पण ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी हे नाट्यपद गात नाहीत, ही बाब त्यांना खटकली होती. ‘गाणारा शिवाजी रंगभूमीवर आणणार आणि ती भूमिका स्वतः करणारच!’ – असे त्यांनी जाहीरच करून टाकले. हे तसे आव्हान आणि धाडस होते. पण त्यांच्यातला कलाकार तयारीत होता. १४ मे १९२१ या दिवशी य. ना. टिपणीस यांच्या नाटकात स्वतः गाणी लिहून त्यांनी पुण्यात ‘शहा शिवाजी’चा शुभारंभी प्रयोग केला. त्यानंतर १ सप्टेंबर १९२१ रोजी शिवरायांची त्यांनी रंगभूमीवरली भूमिका केली. ती त्यांची शेवटची भूमिका ठरली. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. एक रंग झंझावात शांत झाला! संगीतसूर्याला वंदन!!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com