शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जारी
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता आज (ता.१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून जारी केला आहे. देशभरातील योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आता ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील जवळपास ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
१७ व्या हप्त्यासाठी २० हजार कोटी मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, सर्वप्रथम ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’च्या फाइलवर सही केली होती. तर आज मोदी हे आपल्या वाराणसी या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाराणसी दौरा होता. यावेळी त्यांनी ९.२६ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी मंजूर केले आहेत.
आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटींचे वाटप
दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात १ फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत २००० रुपयांचे १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. वर्षाला तीन टप्प्यांत ६००० रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिले जातात. या योजनेद्वारे आतापर्यंत देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
असे चेक करा पीएम किसान योजनेचे स्टेटस
– पीएम किसान योजना अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
– त्यानंतर ‘नो युअर स्टेट्स’ वर क्लिक करा.
– नंतर नोंदणी क्रमांक भरा.
– यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा प्रविष्ट करा.
– सर्व माहिती भरा आणि गेट डिटेल्सवर क्लिक करा.
– आता तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
तुम्हाला १७ व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर pmkisan-ict@gov.in भेट द्या. ज्यावर फार्मर्स कॉर्नरमधील मदत कक्षाला भेट देऊन, तुमच्या तक्रारींचे निवारण करू शकतात. मदत कक्षावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका. पुढील फॉर्म भरून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात.