
फोटो सौजन्य - Social Media
जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मुंबईत पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. टेट्रा पॅक इंडियाच्या ‘गो ग्रीन विथ टेट्रा पॅक’ या उपक्रमांतर्गत आरयूआर ग्रीनलाइफ, रिलायन्स स्मार्ट आणि सहकारी भांडार यांच्या सहकार्याने तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या भागीदारीत दादर येथील वीर बाजी प्रभू उद्यानात शहरव्यापी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन बीएमसीच्या जी-नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. पुनर्वापराच्या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देणाऱ्या या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे वापरलेल्या पेय कार्टनमधून पुनर्प्राप्त करण्यात आलेल्या पॉलिमर-अॅल्युमिनियम (पॉलीअल) साहित्यापासून तयार करण्यात आलेला अभिनव पदपथ. पारंपरिक काँक्रीटच्या पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेल्या या पेव्हर टाइल्स केवळ हलक्या आणि टिकाऊ नसून हवामानातील बदलांनाही तोंड देण्यास सक्षम आहेत. कचऱ्याचे उपयुक्त पायाभूत सुविधांमध्ये रूपांतर कसे करता येते, याचे हे प्रभावी उदाहरण मानले जात आहे.
याचबरोबर ‘कार्टन्स टू क्रीचर्स’ या अभिनव संकल्पनेचेही अनावरण करण्यात आले. पुनर्वापरित अॅसेप्टिक कार्टनपासून तयार करण्यात आलेल्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जागतिक पर्यावरण दिन 2026 च्या ‘निसर्गाकडून प्रेरणा, हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी’ या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या स्थापत्यांमधून पुनर्वापराचे महत्त्व कलात्मक आणि अनुभवात्मक स्वरूपात मांडण्यात आले आहे.
ही स्थापत्ये नागरिकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांना पुनर्वापराचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम करणार आहेत. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी त्यांचे प्रदर्शन भरवले जाणार असून, दैनंदिन वापरातील वस्तूंचे शाश्वत उत्पादनांमध्ये रूपांतर कसे करता येते, याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः तरुण पिढीला पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी करून घेण्याचा उद्देश या मोहिमेमागे आहे.
यावेळी बोलताना सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी मुंबईच्या शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतात, असे सांगत त्यांनी नागरिकांनीही या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. दैनंदिन कचऱ्याकडे संसाधन म्हणून पाहण्याची मानसिकता निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता किरणसिंह पाटील यांनी कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापर या सवयी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. नागरिकांनी जबाबदारीने कचरा व्यवस्थापनात सहभाग घेतल्यास मुंबईतील पुनर्वापर व्यवस्थेला अधिक बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. टेट्रा पॅक इंडियाचे सस्टेनेबिलिटी मॅनेजर कमलेश खोलिया यांनी पुनर्वापराला दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक पुनर्वापरासाठी दिलेले कार्टन हे संसाधनांची बचत, कचरा कमी करणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देणारे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘कार्टन रिसायकलिंग रिले’ हा विशेष संकलन बिन. या माध्यमातून नागरिकांना वापरलेले पेय कार्टन थेट पुनर्वापरासाठी जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिलायन्स स्मार्ट, सहकारी भांडार आणि शहरातील 200 हून अधिक संकलन केंद्रांवर कार्टन जमा करता येणार आहेत.
2010 पासून सुरू असलेल्या ‘गो ग्रीन विथ टेट्रा पॅक’ या उपक्रमाने मुंबईतील हजारो नागरिकांना पुनर्वापर चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आहे. संकलित कार्टनपासून शाळांमधील बाके, उद्यानांतील बसण्याची व्यवस्था आणि विविध जनजागृतीपर स्थापत्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांत ‘कार्टन्स टू क्रीचर्स’ ही प्रदर्शने मुंबईतील विविध भागांत उभारली जाणार आहेत. छोट्या-छोट्या कृतींमधून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावता येतो आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देता येते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. पुनर्वापर आणि पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.