नवी दिल्ली : मार्च महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या भावात सुमारे 3,800 रुपयांची वाढ झाली असल्याचे बाजारपेठ सूत्राने म्हटले आहे. दरम्यान, हा दर 70 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या भावात सुमारे 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 62567 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच वेळी, 8 मार्च रोजी सोन्याने 66,356 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानुसार सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम सुमारे 3,789 रुपयांची वाढ झाली. एखाद्या गुंतवणूकदाराने फेब्रुवारीमध्ये सोन्यात गुंतवणूक केली असती तर त्याला चांगला नफा मिळाला असता.
गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 20 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात स्थिरता येऊ शकते. कारण अशा वाढीनंतर गुंतवणूकदार नफा बुक करू शकतात. काहींच्या मते यावर्षी सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ झाली असून, सोन्याचे भाव वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे डॉलर इंडेक्स (DXY) मध्ये झालेली घसरण असल्याचे सांगण्यात येते.