
Reliance Industries Stock fall: रिलायन्स मार्केट कॅपवर धक्का! शेअरमध्ये अंदाजे ४.२०% ची मोठी घसरण
Reliance Industries Stock fall: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) मधील गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरला. रिलायन्सच्या शेअर्समध्ये अचानक आलेल्या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपलाच धक्का बसला नाही तर संपूर्ण शेअर बाजारालाही तोटा झाला. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीची भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मधील गुंतवणूकदारांना आर्थिक नुकसानीचा ठरला. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी बाजार उघडताच रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये रिलायन्सच्या शेअरमध्ये अंदाजे ४.२०% ची मोठी घसरण झाली. ही घसरण इतकी जलद होती की गुंतवणूकदारांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि काही वेळातच अब्जावधी रुपये बुडाले.
रिलायन्सच्या शेअर्समधील या घसरणीचा कंपनीच्या मार्केट कॅपवर थेट आणि विनाशकारी परिणाम झाला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना रिलायन्सचे बाजार भांडवल १९,७२,४९३.२१ कोटी होते, ते सोमवारी १९,०४,९९६ कोटींवर घसरले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत फक्त एकाच दिवसात ६८,००० कोटींची मोठी घट झाली. आरआयएलचे शेअर्स १,४६१ च्या मागील बंदच्या तुलनेत १,४५०.६० रुपयांवर उघडले आणि नंतर १,४०६.३० रुपयांवर घसरले. रिलायन्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना सुमारे १५% परतावा दिला आहे, परंतु नवीनतम घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
बाजारपेठेतील या घसरणीचा परिणाम केवळ रिलायन्सच नाही तर बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय बँकेवरही झाला. सोमवारी आयसीआयसीआय बँकेचा शेअर १,४१३ च्या मागील बंद किंमतीवरून १,३६० रुपयांवर घसरला, ज्यामुळे त्याचे मार्केट कॅप ९.८० लाख कोटी रुपयांवर आले. विप्रो, टायटन आणि टीसीएस सारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्येही विक्री झाली. या गोंधळात, बीएसई सेन्सेक्स ५०० अंकांनी खाली व्यवहार करत होता आणि निफ्टी १५० अंकांपेक्षा जास्त खाली व्यवहार करत होता.
या लक्षणीय शेअर घसरणीनंतरही, अनेक ब्रोकरेज कंपन्या रिलायन्सवर विश्वास व्यक्त करत आहेत. पीएल कॅपिटलने रिलायन्सवर १,६८३ च्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे. कंपनीचे नवीन ऊर्जा प्रकल्प योग्य दिशेने सुरू आहेत आणि जिओ आयपीओची तयारी भविष्यात स्टॉकला आधार देईल. दरम्यान, ब्रोकरेज फर्म नुवामाकडे १,८०८ च्या आणखी उच्च लक्ष्य किंमतीसह खरेदी रेटिंग आहे. गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेण्याऐवजी दीर्घकालीन दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करावे अशी शिफारस तज्ज्ञ करतात.