Farm to Fork Model in India: भारतात वेगाने रुजतेय युरोपियन मॉडेल ‘फार्म टू फोर्क’; आर्थिक वाढीसाठी ठरेल नवे इंजिन? (फोटो-सोशल मीडिया)
Farm to Fork Model in India: गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे, जेथे कृषी पायाभूत सुविधा अपग्रेड करणे, शेतकरी समुदायाला अधिक कृषी उत्पन्न मिळवून देण्यास मदत करण्यासाठी आर्थिक साह्य करणे, पुरवठा साखळ्या सुव्यवस्थित करणे, अन्नाचा अपव्यय कमी करणे आणि फूड ब्रँडिंग यांना प्राधान्य दिले जात आहे. यासह भारतात ‘फार्म टू फोर्क’ संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येत आहे. त्यामध्ये नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट (ई-एनएएम), प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) आणि पीएम फसल बिमा योजना शेतकऱ्यांना सहजपणे बाजारपेठ व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहेत. ज्यामुळे त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे.
‘फार्म टू फोर्क’ हे युरोपियन मॉडेल एकीकृत पुरवठा साखळी आहे, जी शेतकऱ्यांना शेतात पिकवलेले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवते. भारत विविध प्रकारच्या पीकांची लागवड केला जाणारा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारत सरकार देखील अन्न सुरक्षा आणि कृषी स्थिरतेची खात्री घेत आहे. कोटक महिंद्रा बँकेचे अॅग्री बिझनेस ग्रुपचे प्रमुख पिनाकिन सिमरिया यांच्याकडून भारतात वेगाने होणाऱ्या ‘हरित क्रांती’मागील काही महत्वाची कारणे जाणून घेऊया..
भारत जागतिक स्तरावर विविध खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे परदेशी खाद्य ट्रेण्ड्स झपाट्याने वापरत असले तरी आपली संस्कृती आणि प्रादेशिक पाककलांना प्राधान्य देखील दिले जाते. गेल्या दोन दशकांमध्ये मोठा आर्थिक विकास झाल्यामुळे अन्न सेवन व तयार करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल झाला आहे. बरेचजण जवळच्या ‘चक्की’वर जाऊन गव्हाचे पीठ दळून आणण्याऐवजी आशीर्वाद किंवा फॉर्च्युन असे ब्रँडेड रेडीमेड पीठ खरेदी करत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे उच्च प्रकिया उत्पन्न, स्वच्छतेबाबत अधिक जागरूकता आणि ब्रँडने पॅक केलेल्या उत्पादनांसाठी पसंती या सोयीसुविधेसोबत आरोग्याकडे देखील लक्ष दिले जात आहे.
तसेच, अमूल कंपनी, जी पूर्वी गरिबांना दूध पुरवठा करणारी कंपनी म्हणून ओळखली जात होती, पण आता जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक डेअरी ब्रँड बनला आहे, ज्यामुळे लाखो भारतीयांच्या सवयी देखील बदलल्या आहेत. खरेतर, कंपनीने प्रत्येक वेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान दिले आहे. याचे उत्तम उदाहरण आहे ब्रँडेड चॉकलेट व्यवसाय, जेथे अमूल आज किफायतशीर दरामध्ये सर्व प्रकारच्या चॉकलेट्सची विक्री करत आहे, ज्यामुळे ब्रँड अनेक ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरला आहे.
नियमित खाण्याच्या सवयींमध्ये देखील बदल होत आहेत. केरळ सारख्या राज्यांमधील ग्राहकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. तेथील लोक आता दिवसातून किमान एका जेवणामध्ये गव्हाच्या पीठापासून बनवले जाणारे पदार्थ खातात, ज्यामुळे गव्हाचे पीठ उत्पादित करणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांना या परिवर्तनाचा फायदा घेण्याची मोठी संधी आहे. सांस्कृतिक बदल देखील दिसून येत आहे, जेथे जुनी पिढी देखील रेडी-टू-मेक व क्यूएसआर (क्विक सर्विस रेस्टॉरंट्स) फूडला प्राधान्य देत आहेत.
भारतातील व जगभरातील मोठ्या फूड चेननी किंमती खूप आकर्षक ठेवल्या आहेत, ज्यामुळे व्यक्तींच्या खाण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. म्हणजेच, मॅकडोनाल्ड्स आणि डोमिनोज सारख्या खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्या कमी दरात ग्राहकांना अन्न पुरवतात त्यामुळे भारताची मुख्य खाद्यसंस्कृती काही प्रमाणात मागे पडत आहे.
पूर्वी उत्पादन व व्यवस्थापनासाठी जुन्या पद्धतींचा वापर केला जायचा त्यामुळे अनेकदा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम केले जायचे, तसेच कृत्रिम घटकांचा अतिवापर केला जायचा, परिणामत: ग्राहक अशा उत्पादनांपासून दूर राहायचे. मात्र, आता मशिनरीचे आधुनिकीकरण झाल्यामुळे भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मोठे परिवर्तन होत आहे, ज्यासह उत्पादकता, दर्जा व स्पर्धात्मकता वाढत आहे. सरकारी उपक्रम आणि उद्योगासोबत सहयोगामुळे मशिनरीचे प्रमाणीकरण व तंत्रज्ञान प्रगतीला देखील गती मिळत आहे.
सरकार विविध आर्थिक साह्य व उपक्रमांच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मालमत्ता निर्मितीला पाठिंबा देत आहे. यासंदर्भात प्रधान मंत्री किसान संपदा योजनेचा मोठ्या प्रमाणात फूड पार्क्स, कृषी प्रक्रिया क्लर्स्ट आणि कोल्ड चेन सुविधा स्थापित करण्याचा मनसुबा आहे. प्रधान मंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइझेस स्किम अन्न प्रक्रियेमधील वैयक्तिक एमएसएमईंना क्रेडिट-लिंक भांडवल सबसिडी देते. नुकतेच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अन्नाचा अपव्यय कमी करणे, अन्नधान्य महागाईवर नियंत्रण ठेवणे आणि उत्पन्न वाढवणे यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला आहे. आज, अन्न प्रक्रिया क्षेत्रात आपोआपपणे १०० टक्के एफडीआय मिळू शकते.
भारत विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांसाठी सर्वात मोठा किंवा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे, जेथे २०२५ पर्यंत या उत्पादनांचे एकूण मूल्य ६५४ बिलियन डॉलर्सहून अधिक आहे. देशाने हा दर्जा मिळवण्यासाठी धोरणे, उपक्रम व प्रकल्पांवर काम केले आहे, तसेच जागतिक बाजारपेठांमध्ये पुरवठादार म्हणून भारताला मोठा मान मिळाला आहे. ‘फार्म टू फोर्क’संदर्भात कार्यक्षम यंत्रणेची स्थापना, ग्राहकांपर्यंत अधिक किफायतशीर दरामध्ये व मूल्यवर्धित पद्धतीने उत्पादन पोहोचवणे यांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, शाश्वत पद्धतींना पाठबळ मिळू शकते आणि भारताच्या एकूण आर्थिक विकासाला चालना मिळू शकते.






