अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराची गटांगळी; वाचा... कोणते शेअर्स घसरले!
मंगळवारी (ता.२३) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शेअर बाजाराने मोठी गटांगळी खाल्ली. भारतीय शेअर बाजार अर्थसंकल्पाच्या दिवशीपासून घसरणीला लागला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजार दुसऱ्या दिवशी देखील सावरू शकलेला नाही. प्रामुख्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इक्विटीवरील अल्प भांडवली नफा 20 टक्के आणि दीर्घकालीन भांडवली नफा १० टक्क्यांवरून 12.50 टक्के केला आहे. या निर्णयाचा बाजाराच्या थेट परिणाम पाहायला मिळत आहे.
बँकिंग, एफएमसीजी शेअर्सचा बाजाराला आधार
आज शेअर बाजार (ता.२४) बंद झाला त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) सेन्सेक्स 280 अंकांच्या घसरणीसह 80,149 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 65 अंकांच्या घसरणीसह 24,413 अंकांवर बंद झाला. मात्र,असे असले तरी अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात जोरदार विक्री दिसून आली. या विक्रीचे नेतृत्व बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सनी केले. याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही जोरदार खरेदी दिसून आली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : अर्थसंकल्पात ‘या’ राज्याला मिळाला सर्वाधिक निधी; वाचा… राज्यनिहाय यादी!
2.95 लाख कोटी रुपयांची झेप
विशेष म्हणजे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण होऊनही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजाराचे बाजार भांडवल वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 449.75 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 446.80 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात बाजार मूल्यांकनात बाजाराने 2.95 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.
कोणते शेअर्स राहिले तेजीत?
शेअर बाजारात आज आयटी, फार्मा, मीडिया, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि ऑटो या क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झालेले पाहायला मिळाले. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 587 अंकांच्या उसळीसह 56,872 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 323 अंकांच्या उसळीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 12 समभाग वाढीसह आणि 18 समभाग तोट्यासह बंद झालेले आज पाहायला मिळाले.