फोटो सौजन्य: iStock
जागतिक स्तरावरील आघाडीच्या मल्टी-स्पेशालिस्ट स्पोर्ट्स ब्रँड डिकॅथलॉनने भारतातील आपला 25 वर्षांचा यशस्वी उत्पादन प्रवास साजरा करताना, “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांत 3 अब्ज डॉलर्सचे (अंदाजे ₹25,000 कोटींहून अधिक) स्थानिक खरेदी करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर केले.
कंपनीचा उद्देश 2030 पर्यंत भारतातील उत्पादनाचा वाटा 8% वरून 15% पर्यंत वाढवणे हा आहे. यामध्ये मुख्यतः फुटवेअर, फिटनेस उपकरणे आणि टेक्निकल टेक्स्टाइल यांसारख्या प्रमुख उत्पादन श्रेणींवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. हे सर्व उत्पादने भारतीय आणि जागतिक ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन डिझाइन केली जातील.
डिकॅथलॉन इंडियाचे सीईओ शंकर चॅटर्जी यांनी सांगितले की, “भारतामध्ये गेल्या २५ वर्षांपासून आम्ही मजबूत उत्पादन व्यवस्थेत गुंतवणूक केली आहे. याच गुणवत्तेच्या आणि विश्वासार्ह उत्पादनांमुळे आम्ही भारतातील रिटेल नेटवर्क शहरांपासून मॉल्सपर्यंत आणि त्यापलीकडेही वाढवू शकलो आहोत. आज आम्ही ‘मेड इन इंडिया’ संकल्पनेतून अधिकाधिक उत्पादनांचा विस्तार करत आहोत.”
शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता! ट्रम्पच्या टॅरिफ घोषणेमुळे खळबळ
सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या 70% हून अधिक उत्पादनांची निर्मिती देशांतर्गत केली जाते, आणि 2030 पर्यंत हा आकडा 90% पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. यासाठी 113 उत्पादन केंद्रे, 83 पुरवठादार आणि 7 उत्पादन कार्यालयांचे विस्तृत जाळे कंपनीकडे उपलब्ध आहे. कंपनी योग आणि क्रिकेटसारख्या भारतीय संस्कृतीशी निगडित खेळांवर आधारित श्रेणींमध्येही भर देत आहे. क्रिकेटसाठीची उत्पादने भारतात संकल्पित आणि उत्पादित केली जात आहेत.
उत्पादन व्यवस्थेतील विस्तारामुळे डिकॅथलॉन 2030 पर्यंत भारतात 3 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवत आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था, मूल्यसाखळी आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता यास चालना मिळेल.
डिकॅथलॉनचे ग्लोबल प्रॉडक्शन हेड फ्रेडरिक मेरलेवेडे म्हणाले, “भारत केवळ उत्पादनाच्या प्रमाणातच नाही, तर गुणवत्ता, नावीन्य आणि गती यातसुद्धा जागतिक स्तरावर आमचा आधारस्तंभ ठरला आहे. आमच्या भारतीय भागीदारांसोबतचा विश्वास आणि त्यांच्या क्षमतेमुळेच आम्ही येथे दीर्घकालीन गुंतवणूक करत आहोत.”
डिकॅथलॉन इंडिया प्रॉडक्शनचे प्रमुख दीपक डिसूझा म्हणाले, “भारतामधील आमचा उत्पादन प्रवास आमच्या भागीदारांच्या सहकार्यामुळे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे घडून आला आहे. आम्ही केवळ उत्पादन करत नाही, तर भारत आणि जगासाठी ‘भारतात बनवलेल्या’ खेळाचे भविष्य घडवत आहोत.”
सध्या डिकॅथलॉन भारतात 55 शहरांमध्ये 132 स्टोअर्स चालवत असून, 2030 पर्यंत 90 हून अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी कंपनीने रिटेल विस्तार आणि उत्पादन क्षमता यावर लक्ष केंद्रित करणारी रणनीती आखली आहे.