Mahadev Betting App: महादेव ॲप घोटाळ्यात ईडीची कारवाई; बुर्ज खलिफातील व्हिलासह तब्बल 'इतकी' संपत्ती केली जप्त (फोटो-सोशल मीडिया)
या कारवाईचा एक भाग म्हणून, ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ९१.८२ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. या कारवाईत दुबईस्थित दोन कंपन्यांच्या खात्यांमधील ७४.२८ कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी जप्त करण्याचाही समावेश होता. परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट एलएलसी आणि एक्झिम जनरल ट्रेडिंगचा यात समावेश होता. संबधित आरोपीने जुगाराचा पैसा कायदेशीर म्हणून दाखवलयाचे उघड झाले आहे.
कारवाईसंदर्भात ईडीने म्हटले आहे की, सौरभ चंद्रकर, अनिल कुमार अग्रवाल आणि विकास छपरिया यांच्याशी संबंधित असलेल्या महादेव ॲप आणि स्कायएक्सचेंज कंपन्यांचा वापर अवैध जुगारातून कमावलेला पैसा वैध करण्यासाठी केला जात होता. इतकेच नाही, तर ईडीने गगन गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली १७.५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गगन गुप्ता हे स्कायएक्सचेंजचे मालक हरी शंकर तिब्रेवाल यांच्या जवळचे असल्याचे म्हटले जाते. ईडीच्या म्हणण्यानुसार, या महागड्या मालमत्ता आणि तरल संपत्ती अवैध मार्गाने मिळालेल्या पैशातून खरेदी करण्यात आल्या होत्या.
ईडीच्या तपासात असे उघड झाले आहे की, महादेव ऑनलाइन बुक आणि स्कायएक्सचेंज यांसारख्या अनेक अवैध सट्टेबाजी ॲप आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण झाला होता. महादेव ऑनलाइन बुक ॲप ग्राहकांना विविध अवैध सट्टेबाजी ॲप पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी तयार करण्यात आले होते. तपास यंत्रणेनुसार, या वेबसाइट्स आणि ॲप मध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आला होता, जेणेकरून ग्राहकांचे अंतिम नुकसान होईल. व्यक्तींकडून कोट्यवधी रुपये गोळा केले जात होते आणि एका निश्चित वाट्याच्या सूत्रानुसार या पैशांचे वाटप केले जात होते.






