
परदेशी गुंतवणूकदारांची माघार! दोन आठवड्यांत १८ हजार कोटींची विक्री..; भारतीय बाजारांवर वाढला दबाव
FPI Stocks News: सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ होता दिसून येत आहे. त्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी देखील शेअर बाजाराकडे पाठ फिरवल्याची दिसून येत आहे. याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत तब्बल परदेशी गुंतवणुकदारांनी तब्बल १.६ लाख कोटी रुपये बाजारातून बाहेर काढले आहे. तर डिसेंबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १७,९५५ कोटी रुपये काढले आहेत. नोव्हेंबरमध्ये ३,७६५ कोटी रुपयांची निव्वळ रक्कम काढून घेतल्याने देशांतर्गत शेअर बाजारांवर दबाव निर्माण झाला होता.
ऑक्टोबरमध्ये हा ट्रेंड काही काळासाठी थांबला होता जेव्हा परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) १४,६१० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, ज्यामुळे तीन महिन्यांच्या विक्रीत खंड पडला होता. याआधी, एफपीआयने सप्टेंबरमध्ये २३,८८५ कोटी रुपये, ऑगस्टमध्ये ३४,९९० कोटी रुपये आणि जुलैमध्ये १७,७०० कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, १ ते १२ डिसेंबर दरम्यान, एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून १७,९५५ कोटी रुपये निव्वळ काढून घेतले.
बाजारातील तज्ज्ञांनी या परिस्थितीची अनेक कारणे दिली आहेत, ज्यात रुपयाचे तीव्र अवमूल्यन आणि शेअर बाजारांचे मूल्यांकन यांचा समावेश आहे. मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे प्रिन्सिपल मॅनेजर (रिसर्च) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, अमेरिकेतील उच्च व्याजदर, कडक तरलता परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित किंवा उच्च उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेकडे कल यामुळे भारतीय बाजारांवर दबाव राहिला आहे. भारताच्या बाजारपेठात सुरू असलेली अनिश्चितता हे सगळ्यात मोठे कारण असल्याचे म्हटले जात आहे.
भारताची होणारी वाढ आणि अंदाजे कमाईची शक्यता पाहता सातत्याने विक्री टाळता येऊ शकते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत FPI त्यांचे शेअर्स विकून पुढे दुसरीकडे गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. सध्या अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असून परकीय गुंतवणूक ट्रेंडमध्ये बदल घडवून आणू शकतो. यादरम्यान, शेअर बाजारात एफपीआयने ३१० कोटी रुपये काढले असले तरी त्याच कालावधीत अनेकांनी १५१ कोटी रुपये देखील गुंतवले आहेत.