जगभरातील शेअर बाजार सावरला; भारतीय शेअर बाजारात 875 अंकांची उसळी!
गेल्या पाच सहा दिवसांपासून जागतिक शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत होती. सोमवारी तर भारतसह जागतिक शेअर बाजारात 1987 च्या ‘ब्लॅक मंडे’ची आठवण करून देणारी गंटागळी पाहायला मिळाली. मात्र, मंगळवारी (ता.6) जागतिक शेअर बाजारात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. अमेरिकी शेअर बाजारात वॉल स्ट्रीटवरील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्याचा आता आशियाई आणि युरोपियन शेअर बाजारावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. आज भारतीय शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ८७४.९४ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
मुंबई शेअर बाजाराची ८७५ अंकांनी उसळी
भारतीय शेअर बाजारात मागील तीन दिवसांपासून सलग घसरण नोंदवली गेली होती. मात्र, आज भारतीय शेअर बाजारात तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८७५ अंकांच्या वाढीसह ७९,४६८.०१ अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी ३०४.९५ अंकांच्या वाढीसह २४,२९७.५० अंकांवर बंद झाला आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सकाळी काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, बाजार बंद होताना घसरणीसह बंद झाला होता. तर जागतिक घडामोडींमुळे आज शेअर बाजार पुन्हा सावरला आहे.
हेही वाचा : वऱ्हाडींना मागवले स्वीगीकडून जेवण; ‘या’ जोडप्याच्या लग्नातील पाहुणचाराची सर्वदूर चर्चा!
कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?
भारतीय शेअर बाजारात १० टॉप शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 2.23 टक्के, इन्फोसिसचा शेअर 2.19 टक्के, एचसीएल टेकचा शेअर 2 टक्के वाढीसह तर अदानी पोर्टचा शेअर 1.55 टक्के आणि टाटा स्टीलचा शेअर 1.50 टक्के वाढीसह बंद झाला आहे. याशिवाय मिडकॅप शेअर्समध्ये ऑइल इंदिरा शेअर 6.89 टक्के, लुपिनचा शेअर 4.30 टक्के, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर ४.३० टक्के वाढीसह बंद झाला आहे. तर मल्टि शेअर 10.25 टक्के, SPAL चा शेअर 8.96 टक्के आणि IFB इंडियाचा शेअर 7.57 टक्के वाढीसह व्यवहार करताना आढळून आला आहे.
जगभरातील शेअर बाजार सावरला
अमेरिकी शेअर बाजार सावरल्याने लंडन स्टॉक एक्सचेंजवरही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. लंडन स्टॉक एक्सचेंज 0.5 टक्के वाढीसह व्यवहार करताना आढळून आला. तर जपानच्या टोकियो शेअर बाजारात तब्बल 10.2 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. याशिवाय आशियातील शेअर बाजार देखील सावरला असून, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुमारे 3 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. तर ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स शेअर बाजार 0.4 टक्के वाढीसह आणि चीनमधील शांघाय आणि शेन्झेन शेअर बाजार अनुक्रमे 0.2 टक्के आणि 0.8 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)