
India Fruit Export : भारतीय डाळिंब अन् किवीला दुबईची बाजारपेठ; शेतकऱ्यांना मिळाला 50 टक्के अधिक भाव
भारतीय फळांना (India Fruit Export) आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी संधी उपलब्ध होत आहे. हिमाचल प्रदेशातील डाळिंब आणि अरुणाचल प्रदेशातील किवीची ताजी खेप संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई येथे दाखल झाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) सहकार्यामुळे ही निर्यात शक्य झाली आहे. या उपक्रमामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी परदेशी बाजारपेठांचे नवे दरवाजे खुले होण्याची अपेक्षा आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली. एपीडाने हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून सिंदुरी जातीचे 1.3 मेट्रिक टन डाळिंब, तर अरुणाचल प्रदेशातील झिरो येथून 1.5 मेट्रिक टन किवीची प्रायोगिक निर्यात दुबईपर्यंत पोहोचविण्यास मदत केली.
डाळिंबाच्या खेपेमध्ये प्रत्येकी दोन किलो वजनाचे 650 बॉक्स होते. उत्तर प्रदेशातील अमामा एक्सपोर्ट्स या कंपनीने या डाळिंबांची निर्यात केली. या उपक्रमांतर्गत स्थानिक उत्पादक आणि शेतकरी उत्पादक कंपनीला (एफपीओ) निर्यातदाराशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील फळ उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
ही डाळिंबे स्थानिक शेतकरी आणि भुंतर एफपीओकडून थेट खरेदी करण्यात आली. या एफपीओशी सुमारे 600 शेतकरी जोडलेले आहेत. कुल्लू जिल्हा फलोत्पादन प्रशासनाने खरेदी आणि समन्वयासाठी सहकार्य केले. या निर्यातीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारातील प्रचलित दरांच्या तुलनेत 50 टक्के अधिक भाव मिळाल्याचे मंत्रालयाने सांगितले.
हिमाचल प्रदेशात सिंदुरी ही डाळिंबाची प्रमुख जात मानली जाते. याशिवाय भगवा आणि कंधारी या जातींचीही लागवड केली जाते. आकर्षक लाल रंगाची साल, रसाळ दाणे आणि गोड-आंबट चवीमुळे सिंदुरी डाळिंबाला ताज्या फळांच्या बाजारपेठेत मागणी मिळण्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेशातून निर्यात करण्यात आलेली 1.5 मेट्रिक टन किवीची खेपही यशस्वीरीत्या दुबईत पोहोचली. अल कुसैस येथील लुलू हायपरमार्केटमध्ये ही किवी विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या फळाला किती प्रतिसाद मिळतो, याचा अंदाज घेण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
केंद्रीय पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालयाच्या पुढाकारातून ‘कीवी : अरुणाचल प्रदेशची यूएसपी’ या ब्रँडिंग मोहिमेअंतर्गत राज्यातील किवी उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश अरुणाचलच्या किवीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देणे, ग्राहकांचा प्रतिसाद जाणून घेणे आणि स्थानिक उत्पादकांसाठी निर्यातीच्या संधी वाढविणे हा आहे.
अरुणाचल प्रदेशातील उंचावरील भागांतील हवामान आणि नैसर्गिक परिस्थिती किवी लागवडीसाठी अनुकूल आहे. येथील किवीची गुणवत्ता आणि चव वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगितले जाते. राज्यात हेवर्ड, मोंटी, एलिसन आणि ब्रुनो या जातींची लागवड केली जाते. त्यापैकी हेवर्ड जातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
या प्रायोगिक निर्यातीच्या माध्यमातून स्थानिक किवी उत्पादकांना परदेशी बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. दुबईतील ग्राहकांचा प्रतिसाद आणि निर्यातीसाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करून भविष्यातील निर्यातीचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादकांना विक्रीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.