
IndiGo ने उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात ( सौजन्य - सोशल मीडिया )
इंडिगो आपल्या ‘हिवाळी २०२६’ वेळापत्रकाचा भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील NMIA विमान सेवांमध्ये बदल करत आहे. २५ ऑक्टोबर २०२६ पासून अनेक मार्गांवरील सेवांची क्षमता कमी करण्याची किंवा हे मार्ग बदलून वेगळीकडे वळवण्याची योजना कंपनी आखत आहे. प्रवाशांची मागणी, विमानतळावर उपलब्ध असलेले ‘स्लॉट्स’ म्हणजेच विमान उड्डाण व लँडिंगसाठीच्या वेळा या सगळ्या गोष्टींसोबत, विमानांच्या फेऱ्यांचे नियोजन त्यात एअरक्राफ्ट रोटेशन या बाबींचा विचार करून हे बदल करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, इंडिगो नवी मुंबई ते तिरुवनंतपुरम, सिलीगुडी-बागडोगरा आणि कन्नूर या मार्गांवरील सेवा बंद करेल. कोची आणि मदुराईसाठीच्या विमान सेवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या जाऊ शकतात. या बदलांमुळे नवी मुंबईतील नवीन विमानतळावरून इंडिगोद्वारे चालवल्या जाणाऱ्या मार्गांची संख्यादेखील कमी होणार आहे.
त्याच वेळी, इंडिगो काही महत्त्वाचे मार्ग नवी मुंबईहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याची योजना आखत आहे. नवी मुंबईला विशाखापट्टणम, गाझियाबाद-हिंडन आणि जबलपूरशी जोडणाऱ्या विमान सेवा मुंबईच्या मुख्य विमानतळावर स्थलांतरित केल्या जातील. या निर्णयामागील एक कारण म्हणजे नवी मुंबई विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवांची उपलब्धता मर्यादित आहे, ज्यामुळे काही प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमान सेवांशी जोडले जाणे कठीण जात आहे.
इंडिगो नवी मुंबईतून प्रादेशिक विमानसेवा सुरू ठेवणार आहे. या विमान कंपनीची योजना या विमानतळावर तीन ATR turboprop विमाने तैनात ठेवायची आहे. ही विमाने अहमदाबाद, राजकोट आणि दीव यांसारख्या ठिकाणांसाठी सेवा पुरवणार आहे. तसेच, कंपनी नवी मुंबईतून नागपूर, जोधपूर आणि लखनौ यांसारख्या काही मार्गांवरील आपली क्षमताही वाढवणार आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, इंडिगो या विमानतळावरील आपली उपस्थिती पूर्णपणे कमी करणार नाहीय तर मागणी आणि कामकाजाच्या गरजांनुसार आपल्या नेटवर्कमध्ये बदल करत असल्याचं स्पष्ट होतंय.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा सुरू होऊन वर्ष पूर्ण होण्याआधीच हे बदल होत आहेत. यापूर्वी इंडिगोने या विमानतळावरून आपले नेटवर्क विस्तारले होते आणि अनेक देशांतर्गत ठिकाणांचा त्यात समावेश केला होता. तसेच, मार्च आणि एप्रिल २०२६ दरम्यान कंपनीने नवी मुंबईतून ३० हून अधिक नवीन मार्गांची घोषणाही केली होती.
इंडिगोचे हे अलीकडील वेळापत्रकातील बदल हे दर्शवतात की, प्रवासी मागणी आणि कामकाजाच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर विमान कंपन्या कशा प्रकारे नियमितपणे आपल्या नेटवर्कमध्ये बदल करत असतात. हिवाळी वेळापत्रकादरम्यान या मार्गांची कामगिरी कशी राहते, यावर अवलंबून भविष्यात आणखी बदल केले जाऊ शकतात.