
फोटो सौजन्य - Social Media
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या अधिपत्याखालील कलात्मक जीवनशैली ब्रँड जयपोरने मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या कुलाबा कॉजवे येथे आपल्या आठव्या स्टोअरचे दिमाखात उद्घाटन केले आहे. इतिहास, कला आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुंदर संगम असलेल्या या परिसरात जयपोरचा प्रवेश म्हणजे ब्रँडच्या वारसा आणि सर्जनशीलतेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या उद्घाटनामुळे महाराष्ट्रातील जयपोरची उपस्थिती अधिक बळकट झाली असून, कला-संस्कृतीने नटलेल्या ठिकाणांशी असलेले ब्रँडचे नाते अधिक दृढ झाले आहे.
कुलाबा कॉजवे येथील १४, बालाजी भवन, हार्बर व्ह्यू येथे सुमारे १,०३७ चौरस फूट क्षेत्रफळात हे स्टोअर विस्तारले आहे. मुंबईतील सर्वात प्रभावी आणि गजबजलेल्या रिटेल कॉरिडोरपैकी एक असलेल्या या भागात जयपोरचे स्टोअर सुरू होणे स्वाभाविकच आहे. कुलाबा कॉजवे केवळ बाजारपेठ नसून, विविध संस्कृती, कथा, डिझाइन आणि प्रभाव यांचे प्रतीक मानले जाते. पिढ्यानपिढ्या प्रवासी, संग्राहक आणि कारागिरांनी घडवलेल्या या जागेशी जयपोरची भारतीय कलेवर आधारित डिझाइन तत्त्वज्ञान अतिशय सुसंगत आहे.
या स्टोअरचे इंटेरिअर जयपोरच्या खास ओळखीचे दर्शन घडवते. शांत, संवेदनशील आणि अनुभवप्रधान वातावरण तयार करण्यात आले असून, रंगसंगती, पोत आणि हस्तनिर्मित घटक यांचा सुंदर मेळ घालण्यात आला आहे. ग्राहकांना केवळ खरेदी नव्हे, तर प्रत्येक वस्तूमागील कारागिरी, इतिहास आणि निर्मिती प्रक्रिया अनुभवता यावी, या उद्देशाने स्टोअरची रचना करण्यात आली आहे.
स्टोअरच्या भिंतींवर साकारलेली हस्तनिर्मित वारली कला विशेष लक्ष वेधून घेते. जयपोरच्या दृष्टिकोनातून साकारलेली ही कला ‘कारागिरी की कहानी’ या संकल्पनेला नवे परिमाण देते. दैनंदिन जीवनातील क्षण, वस्तू तयार होण्याचा प्रवास आणि भारतीय कलेचा विकास या कलाकृतींमधून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करताना जयपोरचे उपाध्यक्ष आणि ब्रँड प्रमुख मनू गुप्ता म्हणाले, “कुलाबामधील ऊर्जा आणि सांस्कृतिक समृद्धी जयपोरच्या विचारसरणीशी घट्ट जोडलेली आहे. येथे स्टोअर सुरू करताना आम्हाला वारसा, प्रामाणिकपणा आणि कलात्मक अभिव्यक्तीला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांशी जोडले जाण्याची संधी मिळत आहे.”
या नवीन स्टोअरमध्ये जयपोरचे खास डिझाइन केलेले पोशाख, हस्तनिर्मित दागिने आणि घरगुती सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. गोटा पत्ती, झरदोजी, झरी, हँड ब्लॉक प्रिंट्स, हस्तभरतकाम, बनारसी आणि जामदानी विणकाम यांसारख्या पारंपरिक भारतीय कलांचे आधुनिक सादरीकरण येथे पाहायला मिळते. तसेच डोक्रा शिल्पकला, थेवा, तारकशी, कलमकारी यांसारख्या दुर्मिळ कला प्रकारांचा समावेश असलेल्या होम डेकोर कलेक्शनमुळे स्टोअर अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
आठव्या स्टोअरच्या उद्घाटनासह जयपोरने मुंबईशी असलेले आपले नाते आणखी मजबूत केले असून, आधुनिकतेसोबत भारतीय वारशाला अर्थपूर्ण अभिव्यक्ती देण्याचा ब्रँडचा दृष्टिकोन यातून स्पष्टपणे दिसून येतो.