प्राणघातक मलेरियाविरूद्धच्या लढाईत आता उपयुक्त ठरणार एम-आरएनए लस, या लसींसाठी भारत आणि बेल्जियमची भागीदारी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
India Belgium MoU Marathi News: भारताच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भर टाकणारी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. टेकइन्व्हेन्शन लाइफकेअर प्रा. लि. (TechInvention) आणि बेल्जियममधील क्वांटूम बायोसायन्सेस (Quantoom) यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. या सामंजस्य करारावर ४ मार्च २०२५ रोजी बेल्जियन इकॉनॉमिक मिशन अंतर्गत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या ऐतिहासिक क्षणी बेल्जियमच्या राजकन्या, हर रॉयल हायनेस प्रिन्सेस अस्ट्रिड, तसेच दोन्ही देशांतील उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ज्ञ उपस्थित होते.
ही भागीदारी भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मोठी झेप आहे. मुंबईत टेकइन्व्हेन्शनच्या ‘ग्लोबल कोलॅबोरेटिव्ह सेंटर फॉर मेडिकल काउंटरमेझर्स’ (GCMC) मध्ये ईयू-जीएमपी मान्यताप्राप्त उत्पादन सुविधा उभारली जात आहे, जिथे पूर्ण क्षमतेने एम-आरएनए (mRNA) आधारित औषधांचा विकास होईल.
ही भागीदारी केवळ मानवी आरोग्यापुरती मर्यादित नाही, तर प्राणी व पर्यावरणाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणार आहे. क्वांटूमचे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक व कमी कार्बन फूटप्रिंट असलेल्या (mRNA) उत्पादनांसाठी विकसित करण्यात आले आहे. यामुळे जागतिक पातळीवर mRNA-आधारित लसी आणि औषधे अधिक कमी दरात उपलब्ध होतील, विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील (LMICs) देशांसाठी हा मोठा बदल ठरणार आहे.
जोस कॅस्टिलो, सीईओ, क्वांटूम बायोसायन्सेस, म्हणाले:”आमचा उद्देश म्हणजे mRNA-आधारित लसींचा विकास वेगाने पुढे न्यायला मदत करणे. आमच्या N-Force टूलबॉक्सच्या मदतीने, mRNA उत्पादने अधिक मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात तयार करता येतील. भारतासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बाजारपेठेत टेकइन्व्हेन्शनसोबत भागीदारी करणे हा आमच्या उद्दिष्टांसाठी एक मोठा टप्पा आहे. या भागीदारीतून mRNA आधारित औषध क्षेत्रात अनेक नवी दारे उघडली जातील.”
सय्यद अहमद, संचालक आणि सीईओ, टेकइन्व्हेन्शन, म्हणाले:”क्वांटूमच्या अत्याधुनिक mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये औषध आणि लसीकरणाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होत आहे. ही भागीदारी केवळ भारताच्या नव्या पिढीतील जैवतंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणार नाही, तर भविष्यातील साथींचा सामना करण्यासाठी देशाची तयारीही मजबूत करेल. तसेच, संपूर्ण LMICs देशांना mRNA -आधारित नाविन्यपूर्ण उपचार सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देईल.”
भारत जैवतंत्रज्ञानाच्या पुढच्या पर्वासाठी सज्ज ही भागीदारी भारताला mRNA-आधारित तंत्रज्ञानाचा जागतिक केंद्रबिंदू बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आरोग्यविषयक नवकल्पनांना चालना देत ही संधी जागतिक स्तरावर समतोल आणि कमी दरात आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेईल.