
NPST ला गुंतवणुकीचा 'जॅकपॉट' ! टाटा म्युच्युअल फंडकडून तब्बल 300 कोटींची गुंतवणूक
Tata Mutual Fund: डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंगसाठी पायाभूत यंत्रणा पुरविणारी अग्रगण्य कंपनी नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नोलॉजीज लि. (NPST) ने टाटा म्युच्युअल फंडद्वारे संपूर्ण सदस्यता घेण्यात आलेल्या प्रिफरेन्शियल इश्युच्या माध्यमातून 300 कोटींहून अधिक निधी यशस्वीपणे उभारल्याची घोषणा केली. प्रिफरेन्शियल इश्युअंतर्गत देण्यात आलेल्या 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या, संपूर्ण मूल्य चुकते केलेल्या 14,46,500 इक्विटी शेअर्सच्या लिस्टिंगसाठी कंपनीला NSE व BSE दोहोंकडूनही संमती मिळाली आहे.
हे शेअर्स 2,074 रु. प्रती शेअर किंमतीला जारी करण्यात आले, ज्यात 2,064 रु.चा प्रिमियम अंतर्भूत होता. हे शेअर्स संपूर्णपणे टाटा म्युच्युअल फंडला देण्यात आले, जो नॉन-प्रमोटर इन्व्हेस्टर श्रेणीमध्ये मोडतो. हे शेअर्स जारी झाल्यानंतर टाटा म्युच्युअल फंडाच्या NPST मधील शेअर्सची संख्या 9.42 टक्क्यांनी वाढणार आहे. NPCT ही कंपनी बँका, फिनटेक्स आणि पेमेंट प्लॅटफॉर्मसाठी तंत्रज्ञान सेवा पुरविणारी भागीदार म्हणून काम करते.
कंपनीने 2021 मध्ये काढलेल्या आपल्या IPO द्वारे 13.70 कोटींचा निधी उभा केला व तेव्हापासून आपला क्लाएंटवर्ग 6 बँकांपासून वीस विनियमित संस्थांपर्यंत विस्तारला आहे, हे करत असताना आपला उत्पादन संच व बाजारपेठेतील आपले अस्तित्व लक्षणीयरित्या भक्कम बनविले आहे. उभारण्यात आलेला निधी NPST च्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांकडे वळविला जाईल, ज्यात उत्पादनांमध्ये नवसंकल्पना राबविणे, पायाभूत यंत्रणांमध्ये सुधारणा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये क्षमता उभारणीचा समावेश होतो. कंपनी आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिणपूर्व एशिया व इतर वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट्स परिसंस्थांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याच्या तयारीत आहे.
आजही कंपनीच्या वाढीचे प्रमुख साधन असलेल्या पेमेंट प्लॅटफॉर्म्सना नव्या श्रेणींमध्ये तसेच वसुली, अंतर्निहित वित्तपुरवठा व डिजिटल बँकिंगसारख्या क्षेत्रांत त्यांचा वापर करणाऱ्या प्रांतांमध्ये घेऊन जाण्याचे NPST चे लक्ष्य आहे. पेमेंट्स, कर्जपुरवठा व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील कंपनीच्या क्षमतांशी मेळ साधणाऱ्या व्यापारी संस्था, उत्पादने आणि खाती संपादित करण्यासारख्या बाह्य उपाययोजनांद्वारेही विकास साधण्याची कंपनीची योजना आहे. हे पाऊल एक प्रबळ व वैविध्यपूर्ण जागतिक पोर्टफोलिओ उभारण्याच्या NPST च्या उद्दीष्टाशी सुसंगत आहे.
व्यवसायावरील परिणाम अधोरेखित करताना NPST च्या एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर श्रीम. सविता वशिष्ट म्हणाल्या, “या भांडवलउभारणीमुळे आम्हाला आमच्या विविध उत्पादनांमध्ये, बाजारपेठा व भागीदारींमध्ये आपल्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांना गती देता येईल. आपण एका अशा पर्वामध्ये प्रवेश करत आहोत, जिथे भारतात तसेच जगभरातही डिजिटल पेमेंट्सच्या पायाभूत यंत्रणांना असलेल्या मागणीत वाढ होत आहे. या निधीमुळे मोठी संधी असलेल्या बाजारपेठांमधील कार्यविस्ताराला पाठबळ मिळेल, व त्याचवेळी आम्हाला आपल्या उत्पादनांच्या क्षमतांमध्ये सुधारणा करणे व निवडक संपादनांच्या संधींचा शोध घेणे शक्य होईल.” प्राधान्य तत्वावर करण्यात आलेल्या एका खाजगी प्लेसमेंटद्वारे, Company Act, 2013 व SEBI ICDR नियमनांचे संपूर्ण अनुपालन करत या इश्यूची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.