मुंबई : पर्यावरणपूरक निर्मिती प्रक्रियेला (Environmentally Friendly Manufacturing Process) प्रोत्साहन देण्याच्या टाटा समूहाच्या (Tata Group) संकल्पाला अनुसरून टाटा मोटर्स (Tata Motors) आणि टाटा पॉवर (Tata Power) यांनी पुण्यामध्ये (Pune) टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वापराच्या वाहन निर्मिती प्लांटमध्ये ४ मेगावॅट पीक क्षमतेचा ऑन-साईट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी एक वीज खरेदी करार केला आहे.
लवचिक, पर्यावरणपूरक व शाश्वत भविष्य निर्मितीच्या दिशेने उचलण्यात आलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असून या प्रकल्पामध्ये ५.८ मिलियन युनिट्स वीज निर्मिती केली जाईल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे १० लाख टनांपेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन रोखले जाण्याची शक्यता आहे. हे म्हणजे १६ लाख सागाची झाडे जीवनभरासाठी लावण्यासारखे आहे.
टाटा मोटर्सचे (Tata Motors) कमर्शियल वेहिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे प्लांट हेड आलोक कुमार सिंग म्हणाले, “शून्य उत्सर्जन उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रीनहाऊस वायू उत्सर्जनात घट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. व्यवसायाच्या पर्यावरणपूरक वृद्धीसाठी अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आणि बिझनेस मॉडेल्स आम्ही शोधत असतो. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आमच्या सीव्ही पुणे प्लांटमध्ये एकूण अक्षय ऊर्जा योगदान ३२% होते. आज हा करार करून १००% अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे जात राहण्याची आमची वचनबद्धता आम्ही अधोरेखित करत आहोत.”
आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत टाटा मोटर्सने (Tata Motors) प्रवासी वाहतुकीच्या व व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या निर्मिती कारखान्यांसह आपल्या पुणे प्लांटमध्ये १५ मेगावॅटपीक क्षमतेचा सौर प्रकल्प तैनात केला असून त्यामध्ये २१ मिलियन किलोवॅटअवर्स इतकी अक्षय ऊर्जा निर्माण केली जाते. अक्षय ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील काही वर्षात पुणे प्लांटची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता अजून जास्त वाढवण्याची कंपनीची योजना आहे.
टाटा पॉवरचे सोलर रुफटॉप विभागाचे चीफ शिवराम बिक्कीना म्हणाले, “पुण्यामध्ये वाहन निर्मिती प्लांटमध्ये ४ मेगावॅटपीक क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करून हरित ऊर्जा वापरामध्ये वाढ करण्यात टाटा मोटर्सला सहयोग प्रदान करताना टाटा पॉवरला अतिशय आनंद होत आहे. व्यवसायांचे संचालन हरित व शाश्वत पद्धतीने केले जावे यासाठी हरित उपाययोजना विकसित करण्यासाठी आमच्या सर्व सहयोग्यांसोबत काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
आरई१०० वर स्वाक्षऱ्या करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून टाटा मोटर्स त्यांच्या संपूर्ण संचालनामध्ये १००% शुद्ध ऊर्जा वापरण्यासाठी वचनबद्ध असून यासाठी त्यांनी त्यांच्या कामांमध्ये अक्षय ऊर्जेचे प्रमाण वाढवण्याच्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये या कंपनीने ९२.३९ मिलियन केडब्ल्यूएच शुद्ध वीज निर्माण केली, त्यांच्या एकूण वीज वापराच्या तुलनेत हे प्रमाण १९.४% आहे. यामुळे ७२९९२ मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन टाळता आले आणि २७.३७ कोटी रुपयांची आर्थिक बचत करता आली.
कितीतरी मोठ्या सौर प्रोजेक्ट्सच्या यशस्वी उभारणीचा अनुभव टाटा पॉवरच्या गाठीशी आहे. एकाच ठिकाणी उभारण्यात आलेले जगातील एक सर्वात मोठे रुफटॉप – राधास्वामी सत्संग बीस, अमृतसर (१६ मेगावॅट), कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (२.६७ मेगावॅट), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जगातील एक सर्वात मोठे सौरऊर्जेवर चालणारे मुंबईतील क्रिकेट स्टेडियम (८२०.८ केडब्ल्यूपी), डेल बंगलोर येथे उभारण्यात आलेले सोलर व्हर्टिकल फार्म (१२० केडब्ल्यू), टाटा केमिकल्स, नेल्लोर येथे १.४ मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर आणि असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प टाटा पॉवरने उभारले आहेत. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र लोकांना सौरऊर्जेविषयी तसेच वीज बचतीविषयी जागरूक करण्यासाठी घरांच्या छतांवर सौरऊर्जा रुफटॉप उभारणीचे काम देखील टाटा पॉवर मोठ्या प्रमाणावर करत आहे.
• टाटा मोटर्सने आपल्या पुणे येथील व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या निर्मिती प्लांटमध्ये ऑन-साईट सौर ऊर्जा क्षमता ९ मेगावॅटपीकपर्यंत वाढवली.
• या प्रकल्पामध्ये ५.८ मिलियन युनिट्स वीज निर्मिती केली जाईल, ज्यामुळे १० लाख टनांपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाईल; हे म्हणजे १६ लाख सागाची झाडे संपूर्ण जीवनभरासाठी लावण्यासारखे आहे.